एटीव्हीएमद्वारे हजारो रूपयांची आवक
By Admin | Updated: September 4, 2016 00:14 IST2016-09-04T00:14:04+5:302016-09-04T00:14:04+5:30
तिकीट काऊंटरसमोर प्रवाशांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा बघून गोंदिया रेल्वे स्थानकावर स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग मशीन्स (एटीव्हीएम) लावण्याची मागणी होती.

एटीव्हीएमद्वारे हजारो रूपयांची आवक
स्मार्ट कार्डद्वारे तिकीट : लवकरच लागणार सहा क्वॉईन व्हेंडर मशीन
गोंदिया : तिकीट काऊंटरसमोर प्रवाशांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा बघून गोंदिया रेल्वे स्थानकावर स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग मशीन्स (एटीव्हीएम) लावण्याची मागणी होती. त्यासाठी एकूण आठ मशीन्स प्रस्तावित होत्या. यापैकी सध्या दोन मशिन्स उपलब्ध झाल्या असून त्यांना प्लॅटफॉर्म-१ वर तिकीट काऊंटरच्या बाजूला लावण्यात आले. या दोन मशिन्सच्या माध्यमातून दरदिवशी हजारो रूपयांची आवक होत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळ प्रवाशांना नवनवीन सुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच गोंदिया स्थानकावर दोन एटीव्हीएमच्या सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा विस्तार लवकरच राजनांदगाव, डोंगरगड, आमगाव, बालाघाट, तिरोडा, तुमसर रोड, भंडारा रोड, कामठी, इतवारी, छिंदवाडा व वडसा स्थानकावरही करण्यात येणार आहे. प्रवाशांना त्वरित तिकीट मिळविण्यासाठी या मशीन्स सार्थक ठरतील.
गोंदिया रेल्वे स्थानकातून चारही दिशांना रेल्वेगाड्या धावतात. दरदिवशी २० हजार प्रवाशी रेल्वे गाड्यांत चढतात व एवढेच प्रवाशी येथे उतरतात. तिकीट घेणाऱ्यांची काऊंटरसमोर लांबच लांब रांगा लागतात.
त्यामुळे अनेकांच्या गाड्या सुटून दुसऱ्या गाडीच्या प्रतीक्षेत त्यांना राहावे लागत होते. मात्र आता या मशीन्स लागल्याने तिकीट काऊंटरसमोर लागणाऱ्या प्रवाशांच्या रांगापासून मुक्ती मिळणार आहे. लोकमतने सातत्याने या मशीन्सबाबत पाठपुरावा केला होता.
गोंदिया रेल्वे स्थानकावर लागलेल्या दोन्ही मशीन्स स्मार्ट कार्डद्वारे संचालित होणाऱ्या आहेत. मात्र आता आणखी एक आॅटोमेटिक तिकीट व्हेंडींग मशीन्स गोंदिया स्थानकाला उपलब्ध झाली आहे.
ही नवीन मशीन स्मार्ट कार्डद्वारे नव्हे तर सिक्क्यांद्वारे संचालित होणार आहे. त्यामुळे तिला आॅटोमेटिक तिकीट कॉईन व्हेंडींग मशीन म्हटले जाते.
ही मशीन रेलटोली भागाकडील रेल्वे स्थानकातील तिकीट बुकींग कार्यालयात लागणार आहे. शिवाय आणखी अशा पाच मशिन्स प्रस्तावित असून त्यासुद्धा लवकरच गोंदिया रेल्वे स्थानकाला उपलब्ध होणार आहेत.(प्रतिनिधी)
सोमवारपासून बॅटरीवर चालणारी कार मिळणार
गोंदिया रेल्वे स्थानक परिसरात वरिष्ठ नागरिक तथा दिव्यांग प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर ने-आण करण्यासाठी आता बॅटरीवर चालणाऱ्या कारची सुविधा उपलब्ध होत आहे. सदर कारचे उद्घाटन सोमवारी ५ सप्टेंबरला खासदार नाना पटोले यांच्या हस्ते होणार आहे. सदर बॅटरी आॅपरेटेड कारमुळे गोंदिया स्थानकावर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना होणारा त्रास कमी होणार आहे.