४१ मजुरांची लाखोंची मजुरी १५ महिन्यांपासून थकीत
By Admin | Updated: May 16, 2015 01:23 IST2015-05-16T01:23:39+5:302015-05-16T01:23:39+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील ४१ मजूर मागील १५ महिन्यांपासून मजुरीपासून वंचित आहेत.

४१ मजुरांची लाखोंची मजुरी १५ महिन्यांपासून थकीत
बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील ४१ मजूर मागील १५ महिन्यांपासून मजुरीपासून वंचित आहेत. पोटाला चिमटा मारुन रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेल्या मजूरांना कामाचा मोबदला अजूनपावेतो मिळाला नाही. त्यामुळे ४१ मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे.
तालुका स्तरावरील अधिकारी वेळ मारुन नेण्याची भूमिका बजावित असल्याचे दिसून येत आहे. याबाबत मिळालेल्या महितीनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील ग्रामपंचायतच्या वतीने दोन तलावाचे खोलीकरणाचे काम फेब्रुवारी २०१४ तसेच जून २०१४ या कालावधीत करण्यात आले.
सदर काम जवळपास सहा ते सात आठवडे करण्यात आले. गावातील शेकडो मजूर कामावर होते. काही महिन्यानंतर मोजक्याच मजूरांना कामाचा मोबदला मिळाला. परंतु अजूनही ४१ मजुरांची जवळपास लाख रुपयांची मजुरी थकीत आहे. गेल्या १५ महिन्यांपासून मजुरांना रोहयोची मजुरी अजूनपावेतो मिळाली नसल्याने मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. हाताने कमवून पानावर खाणाऱ्या मजुरांना १५ महिन्यांपासून रोहयोच्या कामाची मजुरी त्यांच्या बँक खात्यावर जमा न झाल्याने ४१ मजुरांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे.
४१ मजुरांचे ९५ हजार ५०४ रुपये मागील १५ महिन्यांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची मजुरी मिळाली नसल्याने त्या मजूरांवर उपासमारीची पाळी आली आहे. रोहयोची मजुरी मिळण्यास वर्षाचा विलंब लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करुन मजुरी त्वरित देण्याची मागणी गावातील मजुरांनी केली आहे. (वार्ताहर)