हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
By Admin | Updated: April 6, 2015 01:48 IST2015-04-06T01:48:19+5:302015-04-06T01:48:19+5:30
येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात रविवारी (दि.५) आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
सिव्हील लाईन्सचे हनुमान मंदिर : हनुमंताच्या दर्शनासाठी अलोट गर्दी
गोंदिया : येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात रविवारी (दि.५) आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. चंद्रग्रहणामुळे पूजन व महाप्रसादाचा कार्यक्रम रविवारी करण्यात आला. यामुळे मंदिरात हनुमंताच्या दर्शनासाठी तसेच महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी भाविकांचा जनसागर उलटला होता.
येथील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान मंदिराची परिसरात ख्याती आहे. हनुमान जयंती उत्सव या मंदिरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हनुमान मंदिराची ख्याती असल्याने मोठ्या संख्येत भाविक येथे दर्शनाला येते. तर मागील कित्येक वर्षांपासून हनुमान जयंतीला महाप्रसाद वितरणाची परंपरा असून हजारो भाविक प्रसादाचा लाभ घेतात.
यंदा मात्र शनिवारी (दि.४) आलेल्या हनुमान जयंतीच्या दिवशीच चंद्रग्रहण आल्याने रात्री ९.३० वाजतापर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आले होते. परिणामी हवन-पूजन व महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम रविवारी (दि.५) घेण्यात आला. त्यानुसार मंदिरात सकाळपासूनच हनुमंताच्या दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी दिसून आली. तर महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी भाविक महिला पुरूषांच्या लांबच लांब रांगाही दिसून आल्या. सायंकाळपर्यंत चाललेल्या महाप्रसादाचा हजारोंच्या संख्येत भाविकांनी लाभ घेतला. (शहर प्रतिनिधी)