योजनांच्या लाभासाठी हे अभियान
By Admin | Updated: November 7, 2015 01:49 IST2015-11-07T01:49:26+5:302015-11-07T01:49:26+5:30
महसूल प्रशासन लोकाभिमुख गतिमान व सुलभ होण्याबरोबर नागरिकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न समस्या व अडचणी थेट समजून गावातच सोडविणे महत्वाचे आहे.

योजनांच्या लाभासाठी हे अभियान
जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : कोका येथे महाराजस्व अभियान
करडी (पालोरा) : महसूल प्रशासन लोकाभिमुख गतिमान व सुलभ होण्याबरोबर नागरिकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न समस्या व अडचणी थेट समजून गावातच सोडविणे महत्वाचे आहे. नागरिकांचे प्रश्न त्वरित निकाली निघण्याच्या दृष्टीने आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मध्यस्थाशिवाय देण्याच्या दृष्टीने महाराजस्व अभियान सन २०१५-१६ अंतर्गत विस्तारित स्वरूपातील समाधान शिबिर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
कोका येथील महाराजस्व अभियानाचे शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. समाधान शिबिर यशस्वी होवून थेट लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने कोका येथे जय्यत तयारी केली.
ग्रामपंचायत व स्टेट बँक कार्यालयाचे परिसरात आयोजित शिबिरात विविध विभागांनी सहभाग नोंदविली. जिल्हाधिकाऱ्यांनी शिबिरानंतर थेट नागरिकांशी कोणत्याही अडथळ्याविना संवाद साधला. कोका येथील वनविभागाच्या विश्रामगृहातही सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत नागरिकांचे प्रश्न, समस्या अडचणी व मागण्या समजून घेतल्या. त्वरित कार्यवाहीचे आश्वासनही देण्यात आले. अधिकाऱ्यांना समस्या, प्रश्न सोडवणुकीचे निर्देशही दिले.
नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यां समोर मांडलेल्या समस्यांमध्ये सुरेवाडा उपसा सिंचन योजनेचे काम धीम्या गतीने आहे. विभाग मात्र कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगत आहे. मात्र कामे प्रलंबित आहेत.
करचखेडा उपसा सिंचन योजना अजुनही रखडलेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील रेतीची ओव्हरलोड वाहतुक करडी, खडकी, ढिवरवाडामार्गे भंडारा, नागपूरला होत आहे. ती बंद करून खापा, मोहाडी मार्गे करण्यात यावी.आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी उपवनसंरक्षक प्रविणकुमार, उपविभागीय अधिकारी संपत खिल्लारी, तहसीलदार सुशांत बंन्सोडे, खंडविकास अधिकारी मंजुषा ठवकर, अभयारण्याचे वनक्षेत्राधिकारी देवेंद्र कुंभारे, जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपते, सरपंच नरवीर टेकाम, उपसरपंच शिवशंकर शहारे, पंचायत समिती सदस्य नीतू सेलोकर, रवीन्द्र तिडके, रवीन्द्र रामटेके, कुंडलीक हातझाडे, सहायक वनक्षेत्राधिकारी खान, मारबते, सुधाकर तिडके, ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील सरपंच, उपसरपंच व सदस्य, आरोग्य, कृषी, पशु संवर्धन, राजस्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी हजर होते. अभियानादरम्यान महसूल विभागाशी संबंधित समस्यांचा निपटारा करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)