घोगऱ्यात आतापासून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य

By Admin | Updated: March 18, 2015 01:04 IST2015-03-18T01:04:40+5:302015-03-18T01:04:40+5:30

घोगरा गावात उन्हाळा लागण्यापूर्वीच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे येथील महिलांचा त्रास वाढलेला दिसत आहे.

There is a scarcity of drinking water in Ghogur | घोगऱ्यात आतापासून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य

घोगऱ्यात आतापासून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य

मुंडीकोटा : घोगरा गावात उन्हाळा लागण्यापूर्वीच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे येथील महिलांचा त्रास वाढलेला दिसत आहे. या गावाशेजारी पाटीलटोला गाव असून येथे शासनाने करोडो रुपये खर्च करून प्रादेशिक नळ योजना सुरू केलेली आहे. पण ती योजना कुचकामी ठरली आहे. या योजनेचे देखभालीचे काम ग्रा.पं. घोगराकडे देण्यात आले आहे. पण सचिव व सरपंच याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
गाव एक असून अर्ध्या गावाला पाणी मिळते. तर अर्धे गाव पाण्याअभावी तहानलेले दिसत आहे. या गावात काही नवीन घरांचे काम सुरू आहे. त्यामुळे काही नागरिक आपल्या घराशेजारी टाक्यांवर विद्युत पंप लावून पाणी पुरवित असतात. त्यामुळे पाण्याच्या फोर्स कमी होऊन अनेकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे.
गावात विहिरी आहेत, पण त्या लांब दूर अंतरावर आहेत. तसेच अनेक बोअरवेल सद्यस्थितीत बंद अवस्थेत असून धूळखात पडलेले आहेत. पण याकडे येथील सचिवांचे लक्ष जात नाही. तसेच गावातील नवीन घरे बांधण्यासाठी जे व्यक्ती नळाच्या पाण्याच्या उपयोग करतात, अशांवर कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नाही.
त्यामुळे त्यांचा जोर वाढला आहे. या योजनेचे पाईप लाईनचे खोदकाम बरोबर नसल्याने कुणाला भरपूर पाणी मिळतो तर कुणाला पाणीच मिळत नाही. मात्र पाणी पट्टीकर हा सर्वांना सारखाच भरावा लागतो. मग ही योजना कशासाठी? असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे.
नळ योजनेचे पाणी अनेकांना मिळत नसल्यामुळे पिण्याकरिता पाण्याची अडचण निर्माण झालेली दिसत आहे. ही बाब सचिव व सरपंच यांना माहिती असूनही नेहमीच ते दुर्लक्ष करीत आहेत. तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून तहानलेल्या गावाची समस्या दूर करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा येथील महिला घागर मोर्चा काढतील, असा इशारा दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: There is a scarcity of drinking water in Ghogur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.