विठू माऊलीच्या वारकऱ्यांसाठी यंदाही विशेष बस नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:42+5:302021-07-07T04:35:42+5:30
कपिल केकत गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सतत दुसऱ्यांदा पंढरीची यात्रा रद्द करण्यात आली असल्याने येथून विठू माऊलीच्या यात्रेत ...

विठू माऊलीच्या वारकऱ्यांसाठी यंदाही विशेष बस नाहीच
कपिल केकत
गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सतत दुसऱ्यांदा पंढरीची यात्रा रद्द करण्यात आली असल्याने येथून विठू माऊलीच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी यंदाही विशेष बस सेवेचे नियोजन करण्यात आलेले नाही. येथून यात्रेत सहभागी होणाऱ्यांची संख्या कमीच असते. मात्र तरीही आगारातून वारकऱ्यांसाठी गाडीचे नियोजन केले जात होते.
येत्या २० तारखेला देवशयनी आषाढी एकादशी येत असून या एकादशीला पंढरपुरात विठू माऊलीची यात्रा भरते. यात्रेत विठू माऊलीचे भाविक लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात. या यात्रेत वारकरी आपली पायी वारी नेत असतानाच जिल्ह्यातून जाणाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांच्यासाठी आगाराकडून बसचे नियोजन केले जात होते. त्या भागातील आगारांना चालक-वाहक व बसची मदत व्हावी व येथील भाविकांना जाण्याची सोय व्हावी या उद्देशातून येथून गाड्या पाठविल्या जात होत्या. मात्र मागील वर्षापासून कोरोनाने कहर केला असून, त्यामुळे आषाढीची यात्राच रद्द करण्यात येत आहे. यंदा आषाढीची यात्रा दुसऱ्यांदा रद्द करावी लागली आहे. यामुळे यंदा येथील भाविकही जाण्याची शक्यता कमी असून वरूनही तसे आदेश आले नसल्याने आगाराने पंढरीच्या यात्रेसाठी विशेष बसेसचे नियोजन केलेले नाही. आषाढीची ही यात्रा वर्षातील सर्वांत मोठी यात्रा असते. या यात्रेच्या निमित्ताने विठू माऊली वारकरी वर्षातून एकदा आपली हजेरी त्यांच्या चरणी लावून येतात. मात्र कोरोनामुळे सतत दुसऱ्यांदा विठू माऊलीच्या वारकऱ्यांना त्यांच्या दर्शनाला मुकावे लागणार आहे.
---------------------------
२०१९ पर्यंत होते नियोजन
सन २०१९ पर्यंत आगाराकडून पंढरपूरच्या यात्रेकरिता २-४ गाड्यांचे नियोजन केले जात होते. बसस्थानकात पंढरपूरसाठी गाडी कधी सुटणार याबाबतची नोटीस लावली जात होती. मात्र सन २०२० पासून कोरोना शिरला व तेव्हापासून पंढरपूरची यात्राच रद्द झाली. यंदाचे हे दुसरे वर्ष असून यंदाही यात्रा रद्द झाल्याने आगारानेे बसेसचे नियोजन केलेले नाही.
----------------------------------
त्या भागातील आगारांची तसेच येणाऱ्या भाविकांची सोय
आगारातून २-४ बसेस पंढरपूर यात्रेसाठी सोडल्या जात होत्या. जेणेकरून येथील भाविक पंढरपूर यात्रेत सहभागी व्हावे व त्या भागातील आगारांना चालक-वाहक व बसेसची सोय होती. शिवाय यात्रेतून बसेस परत येत असतानाच या भागातील भाविकांची परत येण्याची समस्या सुटत होती. मात्र कोरोनाने पंढरीच्या या यात्रेलाच ग्रहण लावले आहे.