रुग्णालयात जागा नाही, मात्र कोविड केअर सेंटर रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST2021-04-19T04:26:34+5:302021-04-19T04:26:34+5:30
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. परिमाणी, रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे शासकीय ...

रुग्णालयात जागा नाही, मात्र कोविड केअर सेंटर रिकामे
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. परिमाणी, रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयातील बेड हाऊसफुल झाले असून सद्य:स्थितीत एकही बेड शिल्लक नाही. जिल्ह्यातील एकूण २१ रुग्णालयात ९९१ बेडची क्षमता असून हे सर्व बेड फुल आहेत. तर १० कोविड केअर सुरू करण्यात आले असून या कोेविड केअर सेंटरची क्षमता ८४८ असून यापैकी केवळ २९८ बेड भरले असून ५५० बेड रिकामे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्णसुद्धा थेट खासगी किंवा शासकीय रुग्णालयात दाखल होत आहे. त्यामुळे गंभीर आजाराच्या रुग्णांना बेड मिळणे अशक्य झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने कुणीही धाेका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली की ऑक्सिजन लेव्हल चेक करून थेट रुग्णालयात दाखल होत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड मिळणे सध्या कठीण झाले आहे. काही रुग्णालयांत तर वेटिंग लागली आहे. रुग्णालयात फोन करून साहेब बेड रिकामा झाला तर सांगा, असे सांगून ठेवले जात असल्याचे चित्र आहे.
........
कोविडग्रस्तांवर उपचार करणारी रुग्णालये
२१
सामान्य बेड
एकूण बेड : ६७१, रिकामे बेड : ००, एकूण ऑक्सिजन बेड ३४० : एकूण रिकामे ऑक्सिजन बेड : ००
कोविड केअर सेंटर
एकूण बेड : ८४८, एकूण रिकामे बेड : ५५०
........
रुग्णांची बेड मिळविण्यासाठी धडपड
मागील आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शासकीय व खासगी कोविड रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. काही करा, पण एक तरी बेड उपलब्ध करून द्या, अशी विनंती रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांना करीत असल्याचे चित्र आहे.
.........
कोट
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मात्र, यात सौम्य आजाराच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. ते गृह विलगीकरणात राहूनसुद्धा उपचार घेऊ शकतात. केवळ गंभीर रुग्णांनीच रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे.
- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
..........
कोविड केअर सेंटरमध्ये ६० टक्के बेड रिकामे
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात १० कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरमधील बेडची क्षमता ८४८ एवढी असून यापैकी केवळ २९८ बेड भरले आहे. तर ५५० बेड शिल्लक आहे. जवळपास ६० टक्के बेड रिकामे आहेत.
...........
सौम्य लक्षणे तरी रुग्णालयात दाखल
बऱ्याच रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. मात्र, काही रुग्ण भीतीपोटी तर काही घरी राहून धोका पत्काराण्यापेक्षा रुग्णालयात दाखल झालेले बरे, म्हणून रुग्णालयात दाखल होत आहेत. शहरातील सिव्हिल लाइन परिसरातील एका रुग्णालयात नेमके हेच चित्र पाहायला मिळाले.