जिल्ह्यात तीव्र भूकंपाची शक्यता नाहीच
By Admin | Updated: July 25, 2015 01:32 IST2015-07-25T01:32:51+5:302015-07-25T01:32:51+5:30
अवघ्या ३ सेकंदाच्या धरणीकंपाने हादरून गेलेल्या जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी गुरूवारची रात्र मोठ्या भितीयुक्त वातावरणात काढली.

जिल्ह्यात तीव्र भूकंपाची शक्यता नाहीच
भूगर्भतज्ज्ञांचा निर्वाळा : दहशतीखालील नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
गोंदिया : अवघ्या ३ सेकंदाच्या धरणीकंपाने हादरून गेलेल्या जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी गुरूवारची रात्र मोठ्या भितीयुक्त वातावरणात काढली. शुक्रवारी दिवसभरही सर्वत्र भूकंपाचीच चर्चा होती. मात्र २४ तासात पुन्हा भूकंपाचा कोणताही धक्का अनुभवायला न मिळाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान जिल्ह्यातील भूगर्भात असलेल्या दगडांचा थर पाहता तीव्र स्वरूपाच्या आणि नुकसानकारक अशा भूकंपाची शक्यता जिल्ह्यात नसल्याचा निर्वाळा भूगर्भतज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या अनेक वर्षात गोंदिया जिल्हावासीयांनी भूकंपाचा धक्का अनुभवला नाही. यापूर्वी जे काही धक्के बसले असतील त्याची तीव्रता कमी असल्यामुळे अनेकांना ते धक्के जाणवलेही नव्हते. मात्र गुरूवारच्या रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी जाणवलेला धक्का सर्वांनीच अनुभवला. आभाळ गडगडल्यासारखा आवाज करीत जमिनीला ३ सेकंदपर्यंत हादरे बसल्याने तळमजल्यासह उंच इमारतीत राहणाऱ्यांनाही भुकंपाच्या धक्क्यांचा अनुभव घेता आला. हा भूकंप रिस्टर स्केलवर ३.९ एवढ्या तीव्रतेचा होता. याचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटर खोलवर होता. (जिल्हा प्रतिनिधी)
भूकंपानंतर देवरी रुग्णालयातून १५ रुग्ण पसार
देवरी : गुरूवारी रात्री आलेल्या भूकंपानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती असलेले १५ रुग्ण रुग्णालयातून पसार झाले. काहींनी तेव्हाच काढता पाय घेतला तर काहींनी आपण स्वत:च्या जबाबदारीवर जात असल्याचे लिहून देत रुग्णालय सोडणे पसंत केले. त्यामुळे शुक्रवारी या रुग्णालयात एकही रुग्ण भरती नसल्याचे चित्र दिसत होते.
देवरीतील ग्रामीण रुग्णालयात विविध आजारांनी ग्रस्त असलेले १५ रुग्ण भरती होते. त्यात काही पुरूष व काही महिला होत्या. भूकंपाच्या धक्क्यात त्यांनी रुग्णालयाची दारे, खिडके हलल्याचे पाहिले. त्यातच रात्री पुन्हा भूकंप येण्याची वार्ता पसरल्याने ते आणखीच घाबरले. रुग्णालयाचे इमारत जीर्ण असल्याने रुग्णांमध्ये घबराट पसरली व त्यांनी तेथून निघून जाणेच पसंत केले.
गेल्या ४० वर्षापूर्वी बांधलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत पावसाचे पाणी गळते. ठिकठिकाणी भिंतींना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रुग्णच नाही तर डॉक्टरांना सुद्धा या ठिकाणी काम करताना भिती वाटते. या इमारतीचे नव्याने बांधकाम करण्यासाठी कळविल्यानंतरही बांधकाम विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मध्य भारतासह विदर्भातील भूगर्भात टणक दगड आहेत. याभागात तीव्र स्वरूपाच्या भूकंपाची शक्यता नसते. जमिनीत खूप खोलवर मोठ्या प्रमाणात पाणी मुरून जमिनीचा स्तर खचला तरच भूकंप येतो. पण तशी परिस्थिती या भागात नाही. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.
- प्रा.सुरेश चोपणे,
भूगर्भतज्ज्ञ, चंद्रपूर
‘ती’ अफवाच ठरली
रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी बसलेल्या भुकंपाच्या धक्क्यानंतर पुन्हा रात्री १२ ते १ च्या सुमारास तीव्र स्वरूपाचा भुकंपाचा धक्का बसणार असल्याचा संदेश मोबाईलवरून सर्वत्र फिरत होता. या संदेशाची खात्री करण्यासाठी ‘लोकमत’कडेही शेकडो लोकांनी विचारणा केली. मात्र जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी त्या शक्यतेबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट करीत कोणीही घाबरून न जाण्याचे आवाहन केल्यानंतर अनेकांचा जीव भांड्यात पडला. मात्र तरीही बहुतांश नागरिकांचा भितीमुळे डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी सर्वकाही ठिक असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांना हायसे वाटले.
विदर्भात मोठा भूकंप नाही
भारतात दोन प्रकारे भूकंप होतो. एका प्रकारात भारतीय भूखंडाची प्लेट युरेशियन प्लेटला टक्कर देते. त्या भूकंपाची तीव्रता जास्त असते. मात्र मध्य भारतात आणि विदर्भातील भूकंप दुसऱ्या प्रकारात मोडतात. दख्खनच्या पठारातील खडकांच्या या प्रदेशात भूकंपाची तीव्रता कमी असते.
विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचाजवळ ४.५ रिस्टर स्केल तिव्रतेचा भूकंप झाला होता. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यात वणीजवळ तसेच नागपूर जिल्ह्यात भुकंप झाले आहेत. मात्र त्याची तीव्रता कमी होती.