तहसील कार्यालयात पिण्याचे पाणीच नाही
By Admin | Updated: April 30, 2016 01:50 IST2016-04-30T01:50:00+5:302016-04-30T01:50:00+5:30
स्थानिक तहसील कार्यालयातील जलशुद्ध थंड पाण्याची मशीन मागील ३-४ दिवसापूर्वीपासून बंद असल्याचे सांगितले जाते.

तहसील कार्यालयात पिण्याचे पाणीच नाही
दुरुस्तीची मागणी : मशीन मागील ३-४ दिवसांपासून पडली बंद
तिरोडा : स्थानिक तहसील कार्यालयातील जलशुद्ध थंड पाण्याची मशीन मागील ३-४ दिवसापूर्वीपासून बंद असल्याचे सांगितले जाते. कार्यालयात कर्मचारी, अधिकारी असो वा सामान्य नागरिक असो, कुणालाही पिण्याचे पाणी मिळू शकत नाही. मशीन बंद पडल्याने तहसीलदार यांनी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. सद्या वातावरणात उष्णता खूप आहे. उष्णतेची लाटच सुरू असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत तहसील कार्यालयात पिण्याचे पाणी मिळू नये, ही शोकांतिकाच आहे.
दुसरीकडे शौचालय व मूत्रिघराच्या मागील कित्येक दिवसांपासून स्वच्छताच करण्यात आलेली नाही. एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, दिवाळीच्या वेळेस तुमच्या लोकमत पेपरला याबाबत बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर स्वच्छता केली होती. तेव्हापासून आतापर्यंत स्वच्छताच केली नसल्याचे सांगितले.
कार्यालयातील पुरुष मंडळी शौचाकरिता बाहेर जातात. परंतु महिला कर्मचाऱ्यांचे काय? कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना काहीच सुविधा प्राप्त होत नाहीत. शौचालय व मुत्रीघरात घाणीचे साम्राज्य असून पाण्याची व्यवस्था नाही.
याशिवाय तहसील कार्यालयात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. पार्किंगचा प्रश्नही सुटला नाही. कार्यालय परिसरात अस्तव्यस्थ दुचाकी पार्क केल्या जातात. नागरिकांना एकाच कामासाठी अनेकदा तहसील कार्यालयाच्या चकरता माराव्या लागतात. तरीपण तहसील कार्यालयातील थंड पाण्याची मशीन तत्काळ दुरुस्त करावी, मशिन दुरुस्त होईपर्यंत पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था तात्काळ करावी, शौचालय व मुत्रीघराची साफसफाई नियमित करण्यात यावी, या गंभीर बाबींकडे गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देवून सदर सामान्य जनतेच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी तिरोडा तालुक्यातील जनतेची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)