‘त्या’ नकली गॅस रेग्युलेटरच्या साठ्याप्रकरणी गुन्हाच दाखल नाही
By Admin | Updated: March 12, 2017 00:18 IST2017-03-12T00:18:10+5:302017-03-12T00:18:10+5:30
नामवंत गॅस पुरवठादार कंपन्यांच्या नावे असलेल्या गॅस रेग्युलेटरचा अवैधपणे साठा करून ठेवून त्याची विक्री करणाऱ्या

‘त्या’ नकली गॅस रेग्युलेटरच्या साठ्याप्रकरणी गुन्हाच दाखल नाही
सहा दिवस लोटले : पोलीस म्हणतात, अहवालाची प्रतीक्षा
गोंदिया : नामवंत गॅस पुरवठादार कंपन्यांच्या नावे असलेल्या गॅस रेग्युलेटरचा अवैधपणे साठा करून ठेवून त्याची विक्री करणाऱ्या गोंदियातील चांदनी चौकातील प्रियांशी अप्लायन्सेस या दुकानावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पाच दिवसांपूर्वी धाड घातली. यात तब्बल ८९६ नकली रेग्युलेटर जप्त केले. परंतु अजूनही या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही किंवा कोणालाही अटक करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणी पाणी कुठेतरी मुरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गेल्या ६ मार्च रोजी कुडवा लाईन, गोयल चौक गोंदिया येथील रहिवासी अविनाश देवानंद आहुजा (३०) यांच्या चांदणी चौकातील प्रियांशी अप्लायन्सेस या दुकानातील ८९६ नकली रेग्युलेटरचा साठा विशेष पथकाने जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या रेग्लुलेटर्सची किंमत ४ लाख ४६ हजार २०८ रूपये सांगितली जाते. यात एचपी, इन्डेन व भारत गॅस अशा तिन्ही नामांकित कंपनीच्या नावाचे रेग्यूलेटर होते.
लोकांना ४९८ रुपयात विकला जाणारे हे रेग्युलेटर लोकांसाठी जीवघेणे ठरू शकते. ज्या कंपन्यांच्या नावे हे रेग्युलेटर आहे त्या तिन्ही कंपन्यांच्या लोकांना पोलिसांनी बोलावले होते. त्यांनी नमुने म्हणून त्यातील काही रेग्यूलेटर तपासणीसाठी नागपूरला नेले आहेत. ते खरोखर आपल्या कंपनीचे आहे का याची तपासणी ते करणार आहे. मात्र आपल्या कंपनीकडून आहुजा यांना कोणतेही रेग्युलेटर पुरविले नसल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
नकली असो किंवा असली, गुन्हा आहेच
या प्रकरणात आतापर्यंत गुन्हा का दाखल केला नाही, याबाबत तपास अधिकारी बोरकर यांना विचारले असता ते म्हणाले, हे गॅस रेग्युलेटर असली आहेत की नकली हे तपासण्यासाठी पाठविले आहे. तो अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असे ते म्हणाले. वास्तविक रेग्युलेटर ‘असली’ आहेत असे गृहित धरले तरी ते तीनही कंपन्यांनी आहुजाकडे अधिकृतपणे विक्रीसाठी दिलेले नाहीत. मग त्याच्याकडे ते आले कसे? याचा सखोल तपास करणे गरजेचे आहे. त्यात आहुजासह त्या कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारीही दोषी आढळू शकतात.
जर ते रेग्युलेटर दिल्लीवरून आललेले नकली असतील तर ते कोणी आणि कुठे तयार केले? याच्या खोलात जाऊन पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे. त्यामुळे रेग्युलेटर असली असो किंवा नकली, या प्रकरणात आहुजा दोषी आहेत हे स्पष्ट दिसत असताना पोलिसांनी पाच दिवसानंतरही गुन्हा दाखल केला नाही. यावरून नागरिकांच्या जीविताशी पुन्हा एकदा पोलीस खेळत असून दोषींना पाठीशी घालत आहेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
दिल्लीवरून आणले
विशेष म्हणजे रेग्युलेटरचा साठा करणाऱ्या आहुजा यांच्याकडे तिन्ही कंपन्यांच्या अधिकृत गॅस रेग्युलेटर विक्रीचा कोणताही परवाना नाही, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी सांगितले. त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस रेग्युलेटर आले कसे, यासंदर्भात पोलिसांनी चौकशी केला असता त्याने सदर रेग्यूलेटर दिल्लीवरून मागविल्याचे सांगितले. फोन करून बोलावल्यावर ते रेग्यूलेटर सहजरित्या येत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यामुळे या नकली रेग्युलेटर विक्रीत मोठी साखळी असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. असे असताना पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही.