शहरवासीयांच्या जीवाचे मोलच नाही
By Admin | Updated: July 26, 2015 01:58 IST2015-07-26T01:58:37+5:302015-07-26T01:58:37+5:30
रस्त्यांवरील खड्डे ‘जैसे थे’ : पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, शहरवासीयांत मात्र खदखदतोय रोष

शहरवासीयांच्या जीवाचे मोलच नाही
गोंदिया : अंडरग्राऊंड नाल्यांची सफाई करण्याच्या दृष्टीने शहरात कित्येक ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध तर कित्येक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला खड्डे (आऊटलेट) सोडण्यात आले आहेत. उघड्यावर पडून असलेले हे खड्डे मात्र आता अपघातांचे जनक ठरत असून या खड्ड्यांमुळे कित्येकदा अपघात घडत आहेत. मात्र या सर्व प्रकारांकडे पालिकेचे सपशेल दुर्लक्ष दिसून येत आहे. या खड्ड्यांवर झाकण टाकणे किंवा त्यांना बुजविण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र पालिका यातही कमकुवत ठरत आहे. यातून मात्र पालिकेला शहरवासीयांच्या जीवाची काहीच घेणे देणे नसून त्यांना लोकांच्या जीवाचे काही मोलच नसल्याचे आता शहरवासी बोलत आहेत.
शहरातील अंडरग्राऊंड नाल्यांची सफाई व्हावी यासाठी ठिकठिकाणी रस्त्यांच्या मधोमध किंवा रस्त्यांच्या कडेला उघडे खड्डे (आऊटलेट) सोडण्यात आले आहेत. या खड्ड्यांद्वारे नाल्यांची सफाई केली जाते. मात्र सफाई झाल्यानंतर या खड्यांवर लगेच झाकण लावून त्यांना बंद करणे हीसुद्धा पालिकेची जबाबदारी आहे. जेणेकरून या खड्यांत पडून किंवा खड्ड्यांमुळे अपघात घडू नये. मात्र गोंदिया शहरातील स्थिती या विपरीत आहे. शहरात सोडण्यात आलेले खड्डे उघडेच दिसून येत आहेत. तर या खड्ड्यांवर त्यांचे झाकण लावण्याचे साधे सौजन्य दाखविण्यासाठी पालिकेकडे वेळ नसल्याचे दिसते.
एरवी ठीक आहे, मात्र सध्या पावसाळा सुरू आहे. शहरात पावसाचे पाणी रस्त्यांवरच साचते. पावसाच्या पाण्यात हे खड्डे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना दिसत नाही. अशात हा प्रकार एखाद्याच्या अंगलट येऊ शकतो व या खड्ड्यांमुळे कित्येक अपघातही घडले आहेत. मात्र पालिका निद्रिीस्त अवस्थेत असल्याने खड्डे तसेच उघड्यावर पडून आहेत. यातून पालिका या खड्ड्यांत अपघात घडून लोकांच्या जीवावर बेतण्याची वाट असावी, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
पालिकेला केल्या कित्येकदा तक्रारी
शहरातील नगर परिषद कार्यालयाशेजारी असलेल्या शारदा वाचनालय समोरच मोठा खड्डा आहे. या खड्ड्यामुळे कित्येकदा अपघात घडले आहेत. यामुळे येथील दुकानदार व आॅटो चालकांना विचारले असता त्यांनी या खड्ड्याला बंद करण्यासाठी कित्येकदा पालिकेला तक्रार केली असल्याचे सांगीतले. मात्र स्थिती आहे तीच आहे. अशात पालिका डोळ्यावर पट्टी व तोंडावर बोट धरून बसल्याचे वाटत असल्याचे बोलत होते.
शहरवासीयांत रोष व्याप्त
शहरातील रस्त्यांची स्थिती, कोलमडलेली स्वच्छता व्यवस्था, डासांचा वाढता प्रकोप त्यात अपघातांना जनक ठरणारे हे खड्डे अशा नानाविध समस्यांवर पालिका काहीच करीत नसल्याने शहरवासीयांत रोष खदखदत आहे. शहरातील गचाळ वातावरणामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले असल्याचे नागरिक बोलतात. नागरिकांत आतल्या आत पालिका प्रशासन व नगरसेवकांना घेऊन रोष निर्माण आहे. मात्र याचा स्फोट भविष्यात कधीही होणार यात शंका नाही.
पदाधिकारीही
गप्प बसून
नगर परिषद उपाध्यक्षांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देत या खड्यांवर झाकण बसवून घेण्याची गरज आहे. मात्र या दृष्टीने त्यांच्याकडून काहीच करण्यात आले नसल्याचे समजते. सफाईनंतर कर्मचाऱ्यांनी खड्ड्यांवर झाकण बसविण्याचे त्यांनी निर्देश देणे अपेक्षीत आहे. मात्र येथील स्वच्छता विभाग किती तत्परतेने काम करतो हे देखील शहरवासी चांगल्याने जाणून आहेत.