जिल्ह्यात अद्याप ७५ हजार निरक्षर
By Admin | Updated: April 30, 2015 01:02 IST2015-04-30T01:02:06+5:302015-04-30T01:02:06+5:30
निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनामार्फत साक्षर भारत अभियान ८ एप्रिल २०११ पासून सुरू करण्यात आले.

जिल्ह्यात अद्याप ७५ हजार निरक्षर
गोंदिया : निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनामार्फत साक्षर भारत अभियान ८ एप्रिल २०११ पासून सुरू करण्यात आले. परंतु दोन वर्षे थातूरमातूर पध्दतीने चाललेल्या या अभियानाचा जिल्ह्यातील लोकांनाा फारसा फायदाच झालेला नाही. गोंदिया जिल्ह्यात आजही ७५ हजार लोक निरक्षर असून त्यांना वाचता-लिहिता येत नसल्याचा अहवाल निरंतर शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे.
१५ वर्षावरील व्यक्तींना साक्षर करून त्यांना ४ थी, ८ वी व त्यावरील शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणे, आक्षर झालेल्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे व घेतलेले शिक्षण कायम राहील याचे नियोजन करण्यासाठी केंद्र शासनाने साक्षर भारत अभियान अमंलात आणला. सन २०१० मध्ये जि.प. शाळातील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी निरक्षरांचा आकडा एक लाख पाच हजाराच्या घरात होता. त्यानंतर डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ पर्यंत या तीन महिन्यात निरक्षरांना साक्षर करण्यात आले. त्यावेळी २५ हजार जणांना नवसाक्षर करण्याचे उद्दिष्ट असताना २३ हजार जणांना नवसाक्षर करण्यात आले.
मार्च २०१३ ला या अभियानासाठी निधी आला नाही. परिणामी हे अभियान बंद राहीले. शासनाने आता पुन्हा नव्याने प्रत्येक निरक्षरामागे अनुदान देण्याचे ठरविले. त्यासाठी नविन सर्वेक्षण करण्याचे ठरविले. निरंतर शिक्षण विभागाने सर्वेक्षणासाठी प्रेरक नियुक्त करून महिनाभरात निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात गोंदिया जिल्ह्यात ७५ हजार लोक निरक्षर आढळले. यात महिलांचे प्रमाण ६५ टक्के आहे. तर पुरूषांचे प्रमाण ३५ टक्के आहे.
सन २०११ मध्ये जिल्हास्तरावर पुस्तकासाठी १३ लाख ६४ हजार रूपये देण्यात आले होते. त्याून पुस्तक खरेदी करण्यात आले. त्यानंतर टेबल, खुर्ची व कपाटासाठी निधी देण्यात आला होता. मार्च २०१३ मध्ये हा कार्यक्रम बंद असल्यामुळे निरक्षरांना साक्षर करता आले नाही. तसेच सुरूवातीपासून फक्त तीनच महिने शिकविल्यामुळे निरक्षरांची संख्या जास्त आहे. (तालुका प्रतिनिधी)