Since there are few centers, the seniors can afford it | मोजकेच केंद्र असल्याने ज्येष्ठांची होतेय परवड

मोजकेच केंद्र असल्याने ज्येष्ठांची होतेय परवड

ठळक मुद्देप्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करा : आतापर्यंत ज्येष्ठांना दिली लस

लोकमत न्यूज नेटवर्क
 गोंदिया : ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना कोरोना लसीकरणास १ मार्चपासून सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत एकूण १६ खासगी आणि सरकारी रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावरुन लसीकरण केले जात आहे. मात्र ग्रामीण भागात लसीकरण केंद्राची संख्या कमी असल्याने गोंदिया शहरातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर गर्दी वाढत आहे. त्यामुळे ज्येष्ठांची परवड होत असून ही परवड दूर करण्यासाठी जिल्ह्यातील ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. 
केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना कोरोना लस देण्यास १ मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील ६ खासगी रुग्णालयांना सुध्दा मंजुरी देण्यात आली आहे तर १० सरकारी रुग्णालयातून लसीकरण केले जात आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी १६४ ज्येष्ठांना आणि दुसऱ्या दिवशी ४३४ जणांना लस देण्यात आली. 
बुधवारी तिसऱ्या दिवशी या सर्व केंद्रावरुन ५५५ ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी वाढत आहे. 
त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दोन तीन तास ताटकळत राहावे लागत असून त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी केंद्राची संख्या वाढवून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. 
 

जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र 
जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिल्यास नागरिकांना सोयीचे होईल. शिवाय त्यांना तालुका अथवा जिल्हा स्तरावर पायपीट करावी लागणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. 
 

 

Web Title: Since there are few centers, the seniors can afford it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.