लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील रेल्वेच्या इंजिन देखभाल टॉवर शेडमध्ये इंजिन नेत असताना त्याचा धक्का लागून शेडची भिंत कोसळली. ही घटना मंगळवारी (दि.२५) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
शहरातील सिव्हिल लाइन इंजिन शेड परिसरात रेल्वेच्या इंजिन देखभाल दुरुस्तीचे टॉवर शेड आहे. शेडमध्ये रेल्वे इंजिनची दुरुस्ती केली जाते. मंगळवारी सकाळी ९ वाजता लोकोपायलट एक इंजिन टॉवर शेडमध्ये नेत असताना इंजिन थोडे पुढे गेल्याने त्याचा धक्का लागून शेडची भिंत कोसळली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
याच शेडच्या बाजूने थोडे पुढे गेल्यानंतर उड्डाणपूल आहे. त्यामुळे इंजिन पुन्हा थोडे पुढे गेले असते तर उड्डाणपुलाला धक्का लागून मोठे नुकसान झाले असते. मात्र, लोकोपायलटने वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा कर्मचारी, रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.