अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : सध्या भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती आहे. देशाचे जवान भारतमातेच्या सुरक्षेसाठी जिकिरीची झुंज देत आहेत. आई, वडील, पत्नी, मुले यांना सोडून सैनिक देशाच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. अशातच जवानाची आई आजारी पडली. अखेरच्या क्षणी मुलाला भेटण्याची तिची इच्छा होती, पण आजारी आईच्या भेटीसाठी निघालेल्या जवानाला युद्धजन्य परिस्थितीमुळे येता आले नाही. दरम्यान, त्या जवानाच्या आईचे सोमवारी (दि.१२) उपचारादरम्यान निधन झाले. त्यामुळे जवानाची मातेची भेट अखेर अधुरीच राहिली.
तालुक्यातील मोरगाव येथील रहिवासी असलेले पितांबर पंढरी शहारे हे गेल्या वीस- पंचवीस वर्षांपासून भारतीय सीमा सुरक्षा दलात पश्चिम बंगाल येथे कार्यरत आहेत. आई-वडील, पत्नी, मुलांना गावीच ठेवून पितांबर शहारे देशाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. पितांबर यांची आई गेल्या आठ-दहा दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर नागपूर येथे रुग्णालयात उपचार सुरू होते. आईला भेटण्यासाठी पितांबर हे ९ रोजी गावाला परत येणार होते, पण भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांना येता आले नाही. तिकडे आईचीसुद्धा मुलाला अखेरच्या क्षणी भेटण्याची इच्छा होती, तर मुलगासुद्धा आईची भेट घेता यावी यासाठी प्रयत्न करीत होता, पण अशातच सोमवारी (दि.१२) दुपारी पितांबर यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे आई व मुलाची भेट अधुरीच राहिली.
अंत्यसंस्काराला येणार मुलगा
जिवंत असताना जन्मदात्या मातेचे दर्शन घेता आले नाही; परंतु आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवान पितांबर शहारे यांना गावाला येण्याची सुटी मिळाली. पश्चिम बंगाल येथून ते निघाले असून मंगळवारी सकाळी नागपूरला पोहोचणार आहेत. यानंतर मोरगाव येथे त्यांच्या गावी त्यांच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.