लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सदाशिव केसकर व रामनगर निवासी खासगी इसम राजेश रामनिवास माहेश्वरी (वय ५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७० हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी (दि.४) ताब्यात घेतले होते. या कारवाईनंतर केसकर यांच्या पुणे येथील निवासस्थानाची झडती घेण्यात आली असता घरातून ६ लाख ६६ हजार रुपये रोख, सोने, चांदीच्या दागिन्यांसह स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून ४ कोटी २५ लाख रुपयांचा मुद्देमाल मिळाल्याची माहिती आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक तपास सुरू केला. नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोंदिया येथील न्यायालयात एआरटीओ राजेंद्र केसकर व खासगी इसम राजेश माहेश्वरीला हजर केले. केसकर यांनी बारामती येथेसुद्धा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळले होते. येथील आरटीओ कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी परराज्यातील जेसीबी पासिंगकरिता संबंधित तक्रारदाराला ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी खासगी व्यक्तीच्या माध्यमातून केली होती. याप्रकरणी गुरुवारी नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरटीओ केसकर व राजेश माहेश्वरी याला अटक केली होती.
कारवाईनंतर आरटीओ कार्यालयात सामसूम
गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरटीओ राजेंद्र केसकर व खासगी व्यक्ती राजेश माहेश्वरी यांना ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटक केली होती. यात घटनेनंतर शुक्रवारी आरटीओ कार्यालयात सामसूम होती.