पंतप्रधानांच्या सल्ल्याकडे सर्वांनीच फिरविली पाठ
By Admin | Updated: October 6, 2014 23:13 IST2014-10-06T23:13:53+5:302014-10-06T23:13:53+5:30
रविवारी ५ आॅक्टोबरच्या सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप उमेदवारांच्या प्रचारदौऱ्यासाठी गोंदियाच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आले होते. त्यांनी सभेत आपल्या भाषणाच्या शेवटी

पंतप्रधानांच्या सल्ल्याकडे सर्वांनीच फिरविली पाठ
सर्वत्र प्लास्टिकचे पाऊच : अखेर नगर प्रशासनानेच राबविले स्वच्छता अभियान
गोंदिया : रविवारी ५ आॅक्टोबरच्या सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप उमेदवारांच्या प्रचारदौऱ्यासाठी गोंदियाच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आले होते. त्यांनी सभेत आपल्या भाषणाच्या शेवटी स्वच्छतेवर भर देण्याचा सल्ला दिला होता. सभेच्या ठिकाणी पडलेला कचराही आपण सोबतच घेऊन जावा, असे आवाहनही त्यांनी प्रेक्षकांना केले. मात्र इतर नागरिकांनी तर सोडा, भाजपच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही.
दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी ६ आॅक्टोबरला पाण्याचे रिकामे प्लास्टिक पाऊच सर्वत्र पसरल्याचे दिसत होते. अखेर नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अभियान राबवून स्टेडियचा परिसर स्वच्छ केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गोंदिया येणार म्हणून जिल्हाभरातील नागरिक मोठ्या संख्येने रविवारी सायंकाळी गोंदियात आले होते. स्टेडियम गर्दीने खचाखच भरले होते. त्यामुळे स्टेडियचे सर्व प्रवेशद्वार बंद करून तेथे पोलिसांची गस्त सुरू होती. यानंतर लोकांना प्रवेश बंद करण्यात आला होता. त्यामुळे स्टेडियमजवळील सर्व रस्ते लोकांनी भरून गेले होते व वाहतूकही ठप्प पडली होती. या प्रकाराने स्टेडियमच्या आत तर प्लास्टिक पाऊचचा कचरा जमा झाला होताच, पण स्टेडियम बाहेरील रस्त्यावरही हा कचरा मोठ्या प्रमाणात साचला होता.
सोमवार ६ आॅक्टोबरच्या सकाळी शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमच्या आत पाण्याचे पाऊच सर्वत्र पसरले होते. त्यांच्या मध्येच फुटबॉलचे खेळाडू आपला दैनंदिन सराव करीत होते. सकाळी ९ वाजताच्यादरम्यान स्वच्छता कर्मचारी स्टेडियममध्ये पोहचले व त्यांनी स्टेडियममध्ये पसरलेले पाण्याचे पाऊच उचलून स्वच्छता करावयास सुरूवात केली. याचप्रकारे सकाळी नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्टेडियममधील दुकानांच्या समोरील रस्त्यावर इतरत्र पडलेले रिक्त प्लास्टिकचे पाऊच जमा केले व ठेल्यात भरून घेवून गेले.
दुसरीकडे जयस्तंभ चौकातील बस स्थानकाच्या आजुबाजूला रिक्त पाण्याच्या पाऊचसह कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. परंतु स्वच्छता कर्मचारी तेथे गेले नाही. तसेच दिवसभरात तेथे कोणत्याही प्रकारे स्वच्छता करण्यात आली नाही. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी दिलेल्या सल्ल्याकडे पाठ फिरविल्यासारखेच वाटत होते.
रविवारी सायंकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी स्वच्छतेवर भर दिला होता. गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्ष भाजपाचे कशिश जायस्वाल आहेत. याच कारणामुळे त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या सल्ल्याने सभेच्या दुसऱ्या दिवशीच स्वच्छतेवर विशेष भर देवून स्टेडियम परिसराची स्वच्छता केली. मात्र जयस्तंभ चौकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष का करण्यात आले याबद्दल चर्चा सुरू होती.
या सर्व प्रकारावरून प्रशासनाने मनात आणले तर शहरातील स्वच्छता योग्यप्रकारे होऊ शकते. त्यासाठी केवळ नगरसेवकांच्या ईच्छाशक्तीचीच गरज आहे, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या. नगर परिषदेचे अध्यक्ष जायस्वाल यांनी सांगितले की, २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची सुट्टी असतानासुद्धा स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामावर लावण्यात आले. त्यांच्यासह नगरसेवकांनीही श्रमदान करून स्वच्छता अभियान राबविण्यात मोलाची भूमिका निभावली.
शहरात स्वच्छतेबाबत सामान्य जनतेतही जागृती आल्याचे दिसून येते. शहरातील अनेक दुकानांसमोर कुडादान ठेवले जाते. तिथे लोक कागद, प्लास्टिकचे पाऊच फेकतात. त्यामुळे जनता व प्रशासनाने मनात ठाणले तर निश्चित शहराला कचरामुक्त केले जाऊ शकते. (प्रतिनिधी)