महाप्रसाद वितरणासाठी मंडळांची नोंदणीकडे पाठ

By Admin | Updated: September 19, 2015 02:58 IST2015-09-19T02:58:11+5:302015-09-19T02:58:11+5:30

गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून महाप्रसाद वितरण केला जातो.

Text to the Mandal Registration for Mahaprasad distribution | महाप्रसाद वितरणासाठी मंडळांची नोंदणीकडे पाठ

महाप्रसाद वितरणासाठी मंडळांची नोंदणीकडे पाठ

‘एफडीए’कडे नाही मनुष्यबळ : अनुचित प्रकार घडल्यास मंडळावर कारवाई
गोंदिया : गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून महाप्रसाद वितरण केला जातो. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी अद्याप तरी प्रशासनाच्या जिल्हा कार्यालयात एकाही मंडळाकडून त्यासंदर्भात अर्ज आलेला नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे महाप्रसादासाठी नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात असले तरी नोंदणी न करता महाप्रसाद वितरण करणाऱ्या मंडळांवर कारवाईसाठी मात्र काहीच निकष नसल्याचेही कळते.
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांकडून भाविकांसाठी महाप्रसाद वितरण केला जाते. ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांसाठी या महाप्रसादाचा मोठा आधार होतो. मात्र महाप्रसादातून कित्येकदा विषबाधेचेही प्रकार घडत असल्याचे दिसून येते. अशात महाप्रसाद वितरण करणारे मंडळ आपले हात वर करतात. असले प्रकार घडू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे मंडळांना नोंदणी करणे आवश्यक आहे. अशावेळी महाप्रसाद खाण्यायोग्य आहे किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची असते. मात्र या विभागाकडे गोंदियात मनुष्यबळच नसल्यामुळे की काय त्यांच्याकडूनही याबाबत दुर्लक्ष केले जात आहे.
आश्चर्याची बाब अशी की, जिल्ह्याचे तर सोडाच मात्र शहरातील १०० च्या वर गणेश मंडळांमधील एकाही मंडळाकडून शुक्रवारपर्यंत ‘एफडीए’ च्या कार्यालयात महाप्रसाद वितरण नोंदणीसाठी अर्ज करण्यात आला नव्हता. वास्तविक प्रशासनाकडे नोंदणी न करता कित्येक मंडळांकडून महाप्रसाद वितरण केले जातात. अशात प्रशासनाकडून मंडळांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र नोंदणी न करता महाप्रसाद वितरण करणाऱ्यांवर कारवाईसाठी काहीच निकष नसल्याने १०० रुपये भरून नोंदणी करायची तरी कशासाठी? असा प्रश्न काही मंडळांना पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)
नोंदणीसाठी काय करावे ?
गणेशोत्सव मंडळांना महाप्रसाद वितरणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधीत गणेश उत्सव मंडळांना धर्मादाय आयुक्तांच्या नोंदणीची प्रत, मंडळाची यादी, ठरावाची प्रत, पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र व जबाबदार पदाधिकाऱ्यांचे दोन फोटो विभागाकडे द्यावयाचे आहे. तसेच महाप्रसाद वितरणासाठी वर्षाला १०० रूपये नोंदणी शुल्क भरावयाचे आहे. मात्र बहुतांश मंडळांना याबाबतची माहितीच नाही. ही माहिती सर्व मंडळांना मिळावी यासाठी सदर विभागाकडूनही विशेष प्रयत्न होताना दिसत नाही.

Web Title: Text to the Mandal Registration for Mahaprasad distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.