धान खरेदी केंद्रांकडे शेतकरी फिरवताहेत पाठ
By Admin | Updated: November 25, 2014 22:57 IST2014-11-25T22:57:24+5:302014-11-25T22:57:24+5:30
जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र उघडण्यास सुरूवात झाली असली तरीही पाहिजे त्या प्रमाणात या केंद्रांवर धान खरेदी होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच अद्याप मार्केटींग फेडरेशन व आदिवासी

धान खरेदी केंद्रांकडे शेतकरी फिरवताहेत पाठ
कपिल केकत - गोंदिया
जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र उघडण्यास सुरूवात झाली असली तरीही पाहिजे त्या प्रमाणात या केंद्रांवर धान खरेदी होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच अद्याप मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रांवर फक्त ५० हजार ८६६ क्विंटल धान खरेदी झाली आहे.
जिल्ह्यात अद्याप धान खरेदी केंद्र पूर्णपणे उघडलेले नसून दर दिवशी एक- दोन केंद्र उघडले जात असल्याचे चित्र आहे. यातून शेतकऱ्यांचा कल धान खरेदी केंद्रांपेक्षा व्यापाऱ्यांकडे जास्त असल्याचे बोलले जात आहे.
आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकरी आपले धान घेऊन जातील व मोठ्या प्रमाणात केंद्रांवर धान खरेदी होणार अशी अपेक्षा होती. मात्र जिल्ह्यात वास्तविक चित्र काही वेगळेच आहे. जिल्ह्यात मार्केटींग फेडरेशनचे ३३ तर आदिवासी विकास महामंडळाचे ३५ केंद्र सुरू असूनही दोघांच्या केंद्रांवर फक्त ५० हजार ८६६ क्विंटल धान खरेदी झाल्याची माहिती आहे.
यातही मार्केटींग फेडरेशनच्या केंद्रांवर नाममात्र १९ हजार १५७ क्विंटल धान खरेदीची आकडेवारी आहे.
ही आकडेवारी बघता शेतकऱ्यांचा कल धान खरेदी केंद्रांपेक्षा व्यापाऱ्यांकडेच जास्त असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. (शहर प्रतिनिधी)