प्रत्येक शाळेतील किमान दोन शिक्षकांची कोरोना चाचणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:29 IST2021-01-23T04:29:54+5:302021-01-23T04:29:54+5:30
गोंदिया : इयत्ता ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांची शाळा २७ जानेवारीपासून सुरू होत आहे. शाळेत जाण्यापूर्वी प्रत्येक शाळेतील किमान ...

प्रत्येक शाळेतील किमान दोन शिक्षकांची कोरोना चाचणी करा
गोंदिया : इयत्ता ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांची शाळा २७ जानेवारीपासून सुरू होत आहे. शाळेत जाण्यापूर्वी प्रत्येक शाळेतील किमान दोन शिक्षकांनी कोविड चाचणी करावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे यांनी दिले आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार ५वी ते ८वीच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्देश असल्यामुळे व शाळा सुरू करण्यापूर्वी पूर्वतयारी तसेच कोविड - १९ नियमांच्या अंमलबजावणीची तंतोतंत अंमलबजावणी करण्याच्या हेतूने शिक्षण विभागाने (प्राथमिक) घेतलेल्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आरटीपीसीआर चाचणी करून प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करतील. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याची देवाण-घेवाण करू नये, शाळेत विद्यार्थी संख्या अधिक असल्यास दुबार, तिबार पाळीत शाळा भरविण्याचे नियोजन करावे, वर्ग सुरु होण्याच्या व संपण्याच्या वेळामध्ये १० मिनिटांचे अंतर असावे, शाळेत गर्दी टाळण्यासाठी आगमन व गमन यांचे वेळापत्रक निश्चित करावे, शाळेला एकापेक्षा अधिक प्रवेशव्दार असल्यास सर्वांचा वापर करावा, शालेय परिसरात ४पेक्षा जास्त विद्यार्थी जमा होणार नाहीत, याचे नियोजन करावे, पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना स्वत:च्या वैयक्तीक वाहनाने ने-आण करावे, शाळेत अभ्यागतांना येण्यास मनाई करण्यात यावी, परिपाठ, स्नेहसंमेलन, क्रीडा कार्यक्रम आयोजित करण्यावर निर्बंध असावेत. एका वर्गात जास्तीत जास्त २० ते ३० विद्यार्थी बसण्याची व्यवस्था असावी, अतिरिक्त वर्गखोल्या असल्यास त्यांना स्वच्छ करून त्यांचा वापर अध्यापनाकरिता करण्यात यावा, एकही विद्यार्थी बाधित होणार नाही, याची खबरदारी व काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सभेला शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रफुल कच्छवे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले व जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन उपस्थित होते.
बॉक्स
अशा दिल्या सूचना
शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, शाळा वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण करणे, शाळा व्यवस्थापन समितीची शाळा सुरू होण्यापूर्वी बैठक आयोजित करून नियोजन करणे, विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची संमती लेखी स्वरुपात घेणे, आजारी असलेल्या मुलांना शाळेत न पाठविणे, शालेय परिसर व वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करणे, शाळेत वावरतांना विद्यार्थ्यांनी ६ फुटाचे अंतर ठेवावे, वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करणे, स्टाफ रुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतरानुसार असावी, थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, शाळेच्या दर्शनी भागावर मास्कचा वापर व घ्यावयाची खबरदारी असणारे पोस्टर, स्टिकर प्रदर्शित करणे, अध्यापन करताना लहान लहान गट तयार करुन शारीरिक अंतर ठेवण्यात यावे, अशा सूचना दिल्या आहेत.