संचमान्यतेच्या नावावर ‘टाईमपास’

By Admin | Updated: December 24, 2015 02:19 IST2015-12-24T02:19:42+5:302015-12-24T02:19:42+5:30

दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत पटावर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरून शाळांवरील शिक्षकांची संचमान्यता निश्चित केली जाते.

'Temp Pass' in the name of permissions | संचमान्यतेच्या नावावर ‘टाईमपास’

संचमान्यतेच्या नावावर ‘टाईमपास’

शिक्षण विभागात घोळ : कोणाचाच पायपोस कोणात नाही
गोंदिया : दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत पटावर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरून शाळांवरील शिक्षकांची संचमान्यता निश्चित केली जाते. पण गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात २०१५ ची तर दूर, २०१३-१४ या वर्षाचीच संचमान्यता अद्याप निश्चित झाली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे पदोन्नतीच्या आणि आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो शिक्षकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दुसरीकडे संचमान्यता मिळायची असल्याचे सांगत शिक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चक्क जि.प. पदाधिकारी आणि सदस्यांचीही दिशाभूल केली जात आहे. सन २०१५-१६ हे शैक्षणिक वर्ष सुरू असले तरी सन २०१३-१४ ची संचमान्यता अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन सन २०१२-१३ च्या संचमान्यतेनुसारच काढण्यात येत आहे. यावरून शिक्षण विभागात किती घोळ सुरू आहे याची कल्पना येते.
बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवून शासनाला लुबाडणाऱ्या काही खासगी शाळा तसेच २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांतील पटसंख्या दाखवा, त्यानंतरच संचमान्यता मिळेल असे ठरवून शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत संच मान्यता निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. परंतु गोंदिया जिल्ह्यात अद्याप सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षाचीच संचमान्यता झालेली नसून सर्वत्र गोंधळात गोंधळ सुरू आहे. माध्यमिक विभागाच्या शिक्षकांचे वेतन सन २०१२-१३ च्या संच मान्यतेनुसार काढण्यात येत आहे.
शासनाने यावर्षी सरल पध्दतीने संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांची पटसंख्या मुख्याध्यापकांनी आॅनलाईन करावी असे निर्देश दिले. शासनाने ही माहिती मागितल्यावर एकदा मागविलेली माहिती पुन्हा-पुन्हा मागावी लागणार नाही असे शासनाला वाटत होते. परंतु संच मान्यतेची माहिती दरवर्षी बदलत असल्यामुळे शासनाने पुन्हा ती माहिती यू-डायस पध्दतीने मागविली आहे.
गोंदिया जिल्ह्यात अनेक पदे रिक्त असताना संच मान्यता मिळायची आहे असे कारण सांगत पदभरती केली जात नाही. संचमान्यतेचे संपुर्ण काम आॅक्टोबरच्या अखरेपर्यंत करायचे होते. परंतु गोंदिया जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग दोन वर्ष मागे चालत आहे. (तालुका प्रतिनिधी)


आॅनलाईन ‘की यू डायस’ संदर्भात संभ्रम
संच मान्यतेसाठी मुख्याध्यापकांना द्यावी लागणारी माहिती आॅनलाईन पध्दतीनेच द्यायची आहे, असे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी सांगितले. मात्र आता जुन्याच यू डायस पध्दतीने माहिती मागविली आहे, असे शिक्षणाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संच मान्यतेची माहिती आॅनलाईन द्यायची, की यू डायस पध्दतीने, या संदर्भात संभ्रमाची स्थिती आहे.

मुख्याध्यापकांपुढे अनेक अडचणी
संबंधित मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यांची पटसंख्या आॅनलाईन पाठविण्याचे काम सुरू आहे. परंतु काही मुख्याध्यापकांना शासनाला आॅनलाईन माहिती पाठविता आली नाही. शाळेत संगणक आहे, पण विजेची सोय नाही. विद्युतची सोय केली तर इंटरनेटची सुविधा नाही, त्यात सादीलवार राशी नाही. त्यामुळे प्रत्येक कामासाठी आपल्या खिशातून पैसे काढून देण्यास मुख्याध्यापक इच्छुक नाहीत. परिणामी अनेक मुख्याध्यापकांनी ही माहिती पाठविलीच नसल्याचे सत्य पुढे येत आहे.
आठ दिवसापूर्वी मिळाले आदेश
शासनाने सरल पध्दतीने आॅनलाईन संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील संस्था संचालक न्यायालयात गेले होते. यात गोंदियातीलही काहींचा समावेश आहे. न्यायालयाचा निकाल येताच शासनने ८ डिसेंबर रोजी संच मान्यतेची माहिती देण्यात यावी असे आदेश काढल्याचे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: 'Temp Pass' in the name of permissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.