सांगा, माझी काही चूक झाली का ?
By Admin | Updated: March 14, 2016 01:46 IST2016-03-14T01:46:10+5:302016-03-14T01:46:10+5:30
मी नेहमीसारखी शेळ्या चारत होती. मी नाही म्हटले असतानाही विवेक, विक्की अन् शेजारचं एक पोर सोबत खेळत तिकडे शेताकडे आले.

सांगा, माझी काही चूक झाली का ?
विक्कीच्या आजीचा सवाल : भेटी देणाऱ्यांच्या गाड्यांच्या धुराळ्याने माखले राका
मनोज ताजने गोंदिया
मी नेहमीसारखी शेळ्या चारत होती. मी नाही म्हटले असतानाही विवेक, विक्की अन् शेजारचं एक पोर सोबत खेळत तिकडे शेताकडे आले. तिथे बोअरचा खड्डा खोदला आहे याची कल्पनाही मला नव्हती. तिकडच्या पाळीकडे चरत गेलेल्या एका शेळीला आणण्यासाठी मी गेली अन् त्याचवेळी भूकंप झाल्यासारखा आवाज झाला. विक्की खड्ड्यात पडल्याचं सांगत विवेक अन् त्याच्यासोबतचं पोर धावत माझ्याकडे आले. पण असा काही भयंकर प्रकार होईल याचा कधी विचारही केला नव्हता. सांगा, यात माझी काही चूक झाली का? असा आर्त सवाल बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या विक्कीची आजी सिंधूबाई दोनोडे हिने केला.
या घटनेच्या एकमेव सज्ञान साक्षीदार असलेल्या सिंधूबाई शनिवारी या दुर्घटनेचा घटनाक्रम सांगत होत्या. आपल्या दुर्लक्षामुळेच नातवाचा जीव गेला असे लोकांना वाटेल, या अपराधीपणाच्या भावनेने ग्रस्त असलेल्या सिंधूबाई आपली बाजू स्पष्ट करीत होत्या.
विक्की खड्ड्यात पडल्याचे सांगताच सिंधूबाई तिकडे धावल्या. त्यांनी खड्ड्यात डोकावून पाहीले, विक्कीला आवाज देऊन पाहीले, पण ना त्यांच्या आवाजाला विक्कीकडून काही प्रतिसाद आला, ना त्याच्या रडण्याचा आवाज आला. अतिशय खोलवर जाऊन तो फसला होता. वस्तुस्थितीची कल्पना येताच सिंधूबाईला तिथेच चक्कर येऊ लागली. कशीबशी पोरं गावाकडे आली, अन् ही खबर गावभर पसरून मदतकार्य सुरू झाले. पण अखेर विक्कीला वाचविण्यात मात्र यश आले नाही.