‘त्या’ तहसीलदाराकडे आढळले १.१४ लाख
By Admin | Updated: July 14, 2015 02:17 IST2015-07-14T02:17:02+5:302015-07-14T02:17:02+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सापळा रचून केलेल्या कारवाईत सालेकसाचे तहसीलदार उईके व लिपिक भोयर

‘त्या’ तहसीलदाराकडे आढळले १.१४ लाख
गोंदिया : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सापळा रचून केलेल्या कारवाईत सालेकसाचे तहसीलदार उईके व लिपिक भोयर यांना लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांची सोमवारपर्यंत (दि.१३) असलेली पोलीस कोठडी संपली. दरम्यान उईके यांच्या अंगझडतीत व घरझडतीत आढळलेल्या १ लाख १३ हजार रुपयांच्या रकमेचा ते हिशेब देऊ शकले नाही.
कंस्ट्रक्शन कंपनीचे वाहन पकडून ते सोडण्यासाठी तसेच कारवाई न करण्यासाठी ८० हजार रूपयांची मागणी सालेकसाचे तहसीलदार निवृत्ती जगन उईके (५०) यांनी कंस्ट्रक्शन कंपनीचे सुपरवायजर यांच्याकडे केली होती. मात्र सुपरवायजरच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी सालेकसा तहसील कार्यालयात सापळा लावून तहसीलदार उईके यांना कार्यालयातील कनिष्ठ लिपीक योगेश मोतीराम भोयर (३९) याच्यामार्फत ३५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते.
विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान तहसीलदार उईके यांच्या अंगझडतीत त्यांच्याकडे २६ हजार ५०० रूपये तर घर झडतीत ८८ हजार रूपये रोख मिळून आले. ही एक लाख १४ हजार ५०० रूपयांची रक्कम कुठून आली याचे समाधानकारक उत्तर ते देऊ न शकल्याने रक्कम तपासकामी जप्त करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)