लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तुमच्या शरीरात क जीवनसत्त्वाच्या (अॅस्कॉर्बिक आम्ल) तीव्र कमतरतेमुळे 'स्कर्ती' हा आजार होऊ शकतो, जो कमी पोषणाशी संबंधित आहे. हा तुम्हाला अशक्त बनवू शकतो. रक्तक्षय होऊ शकतो आणि तुमच्या त्वचेखाली रक्तस्राव होऊ शकतो. हिरड्यांमधून रक्त येणे हे 'स्कर्ती'चे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे.
'स्कर्ती' हा क जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. क जीवनसत्त्वाचा स्रोत एस्कॉर्बिक आम्ल आहे. क जीवनसत्त्व हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आणि ऑक्सिइनरोधी आहे. हे शरीराच्या सर्व भागांतील ऊतींच्या वाढीमध्ये आणि दुरुस्तीमध्ये मदत करते. तसेच हाडे आणि दात टिकवून ठेवते आणि लोह शोषण्यास मदत करते. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अशक्तपणा, थकवा जाणवणे, कुरळे केस आणि हात पाय दुखणे यांचा समावेश होतो.
दुर्लक्ष करून चालणार नाहीहिरड्यांतून रक्त येणे ही मूलभूत समस्या असून, अनेकांना या आजाराचा सामना करावा लागतो. हिरड्या हा संवेदनशील भाग आहे. अनेक वेळा ब्रश केल्यानंतरही हिरड्यांमधून रक्त येते. मात्र, हिरड्यांमधून वारंवार रक्तस्राव होत असेल तर ते काळजीचे कारण आहे. कारण हिरड्यांमधून रक्त येण्याची विविध कारणे असू शकतात. काही वेळा हिरड्यांमधून रक्त येणे कर्करोगाचेसुद्धा लक्षण असू शकते. त्याचप्रमाणे मधुमेह असेल किंवा हिरड्यांच्या विकारांमुळेसुद्धा रक्त येऊ शकते. त्यामुळे हिरड्यांमधून रक्त येणे दुर्लक्षित करून चालणार नाही. याकरिता दंतरोगतज्ज्ञांचा वेळीच सल्ला घेणे गरजेचे आहे.
हिरड्यांतून रक्तस्रावाची कारणेपेरिओडॉन्टायटीस हा हिरड्यांचा आजार आहे. या आजारावरील उपचार करणे गरजेचे आहे. या आजारावर वेळेत उपचार न केल्यास दातांचे संरक्षण करणाऱ्या टिश्यू (उती) आणि हाडांवर याचा बदल जाणवण्यास सुरुवात होते. यामध्ये हिरड्या सुजतात, ज्यामुळे दात मुळापासून वेगळे होण्याची प्रक्रिया सुरू होते. हिरड्यांमधून रक्तप्रवाह असाच सुरू राहिला तर पेरिओडॉन्टायटीसचे हे लक्षण असू शकते.
काय काळजी घ्याल?मौखिक आरोग्याची काळजी राखणे गरजेचे आहे, तसेच दिवसातून दोनदा दात घासणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे. व्यसनापासून दूर राहणे. संतुलित आहार आणि व्यायाम करून स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणे, आहारात हिख्या पालेभाज्यांचा वापर तसेच मोसमानुसार उपलब्ध असलेली ताजी फळे खावीत.
डॉक्टरांना कधी भेटायचं?हिरड्यांमधील रक्तस्राव वारंवार होत असेल तर डॉक्टरांना भेटून घेणे गरजेचे आहे. वर्षातून किमान एकदा दंतरोग तज्ज्ञांकडून तपासणी करणे गरजेचे आहे
रक्तस्राव आणि निदान
- रक्ताचा कर्करोग : ल्युकेमिया या कर्करोगात हिरड्यांतून रक्तस्राव होत असतो. कर्करोग असल्याने प्लेटलेट्सची संख्या कमी होते. परिणामी, रक्तस्राव थांबणे अशक्य होते.
- मधुमेह : ज्या व्यक्तींना मधुमेह होतो त्यावेळी त्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यावेळी अशा व्यक्तींना हिरड्यांचा संसर्ग होण्याची शक्यता असून, त्यामुळे त्यातून रक्त येण्याची शक्यता असते.
- निदान : हिरड्यांतून रक्त येणे थांबत नसेल तर तत्काळ दंतरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण हिरड्यांतून रक्त येणे चांगले लक्षण नव्हे. आरोग्याच्या अन्य व्याधींमुळे हिरड्यांमधून रक्त येऊ शकते. दंतरोगतज्ज्ञ तोंडाची तपासणी करून रक्त येण्यामागे नेमके कारण काय ते शोधून काढतात. काही वेळा सहव्याधी आहेत का, याची तपासणी केली जाते.
"सहव्याधीमुळे हिरड्यांमधून रक्त येणे हा एक प्रकार आहे. मात्र, त्यापेक्षा हिरड्यांमधून रक्त येण्याचे मूलभूत कारण म्हणजे 'व्हिटॅमिन सी'ची कमतरता. अनेक वेळा मधुमेहींना हा त्रास जाणवत असतो, तर काही वेळा दातावरील कॅप या वर्षानुवर्षे तशाच राहिल्यामुळे त्या ठिकणी संसर्ग निर्माण होऊन त्या दाताच्या अवतीभोवती असणारी हिरडी सुजते आणि रक्त येते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी मौखिक आरोग्य सुदृढ ठेवणे गरजेचे असते. वर्षातून किमान एकदा दंतरोगतज्ज्ञांकडून मौखिक आरोग्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे."- डॉ. श्रीकांत राणा, दंतरोगतज्ज्ञ, आमगाव