समाजात समरसता निर्माण करणे संघाचे कार्य
By Admin | Updated: October 28, 2015 02:09 IST2015-10-28T02:09:34+5:302015-10-28T02:09:34+5:30
देशात काही लोक समाजाला जातीपातीच्या नावावर तोडण्याचे कार्य करीत आहेत. पूर्वी ब्रिटिशांनी ‘डिव्हाईड अँड रूल’ने तर मुघलांनी समाजाची एकता तोडून देशाला गुलाम करून राज्य केले.

समाजात समरसता निर्माण करणे संघाचे कार्य
अनिल पत्की यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव
ंगोंदिया : देशात काही लोक समाजाला जातीपातीच्या नावावर तोडण्याचे कार्य करीत आहेत. पूर्वी ब्रिटिशांनी ‘डिव्हाईड अँड रूल’ने तर मुघलांनी समाजाची एकता तोडून देशाला गुलाम करून राज्य केले. यापुढे कुणीही समाजाला तोडू नये यासाठी समाजात समरसतेचे भाव जागृत करून एकता स्थापित करणे गरजेचे आहे. संघ हे कार्य निरंतर करीत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य अनिल पत्की यांनी केले.
रविवार (दि.२५) रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोंदिया नगरच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवानिमित्त सुभाष शाळेच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी मंचावर अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते अॅड. हरिभाऊ सूर्यवंशी, वक्ते अनिल पत्की, भंडारा विभागाचे सहसंघचालक दिनेश पटेल, नगर संघचालक मिलिंद अलोनी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. यानंतर स्वयंसेवकांनी योगासन, नियुद्ध, दंड, व्यायाम योगाचे प्रात्यक्षिक सादर केले.
पत्की पुढे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात समरसता निर्माण करण्यासाठी मोलाचे कार्य केले. सरकारने इंदू मिल येथे भारतरत्न डॉ.आंबेडकर यांचे भव्य स्मारक करण्याचे कार्य व लंडन येथील त्यांचे वास्तव्य असलेले घर खरेदी करण्याचे स्तुत्य कार्य केले.
आज सर्वत्र गोहत्याबंदीच्या मुद्याचे राजकारण केले जात आहे. मात्र देशातले पशूधन वाचविले गेले नाही तर येणाऱ्या काळात फार मोठे संकट निर्माण होईल. ८० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. हे पशूधन असेच समाप्त झाल्यास येत्या ५० वर्षात देशातील भूमी ‘बंजर’ होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश्य भारत देशाला विश्वगुरू बनविण्याचा आहे. सन १९२५ मध्ये डॉ. हेडगेवार यांनी लावलेले रोपटे आज वटवृक्षात परिवर्तीत झाले आहे. या ९० वर्षांत ५० हजारांवर देशात शाखा सुरू असून ३५ देशांत संघाचे कार्य सुरू आहे. एक लाख ७६ हजार सेवाकार्य संघाच्या माध्यमातून स्वयंसेवक चालवित आहेत.
बालपणापासूनच संस्कार देण्याचे कार्य संघ करते. संस्कार भारती, सहकार भारती, उद्योग भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आदी माध्यमातून शारीरिक व बौद्धिक संस्कार घडविण्याचे कार्य अविरत सुरू आहे. संघाचे स्वयंसेवक देशातील विविध क्षेत्रात कार्य करीत असून ते प्रगतशील व यशस्वी कार्य करीत आहे. चांगल्या कार्याकरीता समाजातील सज्जनांची साथ असावी. यामुळे सर्वांनी सोबत येऊन शक्ती संचय करणे ही काळाची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
प्रमुख पाहुणे अॅड. हरीभाऊ सूर्यवंशी यांनी आपल्या उद्बोधनातून सांगितले की, व्यक्तीची उपयोगिता ही जातीपातीने न करता गुण व योग्यतेने व्हायला हवी. दोन वर्षाआधी कोलंबिया युनिव्हर्सिटीने एक प्राविण्य सूची तयार केली. त्या १०० लोकांच्या यादीत पहिले नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते. तसेच ‘दि नॉलेज आॅफ वर्ल्ड’ या नावाने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर डॉ. आंबेडकरांचे नाव व छायाचित्र कोरले गेले आहे. ही आपल्याकरिता गर्वाची बाब आहे. डॉ. आंबेडकर हे कायदामंत्री झाल्यानंतर त्यांनी लिहिलेल्या संविधानात न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या चार प्रमुख बाबींचा अंतर्भाव करून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे कार्य केले आहे.
संघाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला रक्तदान व विशेष बुलेटिन देण्याचे कार्य स्तुत्य आहे. या विजयादशमीला समाजातील वाईट गोष्टींवर विजय प्राप्त करून प्रेम व शांतता नांदवावी, असा संदेशही त्यांनी शेवटी दिला.
प्रास्ताविक व आभार नगर कार्यवाह बाळकृष्ण बिसेन यांनी केले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संघासाठी महत्त्वाचे तीन बिंदू
आमगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होऊन ९० वर्षे झाली. तेव्हापासून संघ हा समाजातील अंतिम घटकाच्या विकासाकरिता प्रयत्नशील आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता व विकास या तीन बिंदूना केंद्रस्थानी ठेऊन भारताचे संविधान लिहले. तर संघाने या तीन बिंदूना सर्वतोपरी मानून समाजात सामाजिक समरसता स्थापन करण्याचे कार्य केले. समाजातील जात-पात, भेदभाव, स्पृश्य-अस्पृश्य अशी सामाजिक विषमता दूर करण्याचे संघाचे कार्य यापुढेही अविरत सुरू राहील, असे विचार नागपूर महानगरचे सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी मांडले. आमगावच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. २५ आॅक्टोबरला सायंकाळी ६ वाजता सदर उत्सव आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आला. या वेळी अतिथी म्हणून वसंत मेश्राम, तालुका संघचालक निताराम अंबुले उपस्थित होते. सर्वप्रथम शस्त्रपूजन व भारत मातेचे पूजन झाले. त्यानंतर स्वयंसेवकानी योगासन, डम्बेल्स, शारीरिक प्रात्यक्षिके व व्यायाम योग सादर केले. घोष, दंड, सुभाषिते व सामूहिक गीतांनी नगरी दुमदुमली. गाडगे पुढे म्हणाले, शस्त्रपूजन व शक्ती पूजनाने दरवर्षी दशहरा उत्सव साजरा केला जातो. समाजात संघाबद्दल गैरसमज पसरविले जातात. मात्र सत्य जाणले जात नाही.