खताचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाचे पथक
By Admin | Updated: September 25, 2014 23:25 IST2014-09-25T23:25:09+5:302014-09-25T23:25:09+5:30
सध्या युरिया खताची मागणी जोरात सुरू आहे. निर्धारित किमतीपेक्षा जास्त दराने युरिया खताची विक्री होऊ नये, शेतकऱ्यांची लुबाडणूक कृषी केंद्रामार्फत होऊ नये म्हणून अर्जुनी/मोरगाव तालुका कृषी

खताचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाचे पथक
बोंडगावदेवी : सध्या युरिया खताची मागणी जोरात सुरू आहे. निर्धारित किमतीपेक्षा जास्त दराने युरिया खताची विक्री होऊ नये, शेतकऱ्यांची लुबाडणूक कृषी केंद्रामार्फत होऊ नये म्हणून अर्जुनी/मोरगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत तालुक्यात सर्वत्र पथक सतर्क करण्यात आले आहे.
शेतकरी बांधवांकडून युरिया खताची मागणी होत असल्याने जास्त दराने कृषी केंद्रामार्फत युरिया खताची विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक होत असल्याची सर्वसामान्य शेतकऱ्यांची ओरड आहे. याची दखल घेवून तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी तालुक्यातील कृषी केंद्रावर पथकाची नियुक्ती केली आहे.
तालुक्यातील १७ कृषी केंद्रामध्ये २३ तारखेला १६५ टन (३०३० थैल्या) युरिया खत उपलब्ध झाला. शेतकऱ्यांनी कृषी केंद्रामधून युरिया खत प्रती थैली २९८ रुपये देऊनच खरेदी करावे व बील पावती घ्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक होऊ नये यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने मंडळ अधिकारी नंदकुमार मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, राऊत, ठाकूर, हिंगे, कृषी सहायक काळे, सूर्यवंशी, रहांगडाले, बडोले, येरणे, डोंगरवार, बोचरे, बोरकर यांची तालुक्यातील १७ कृषी केंद्रावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्ती केली आहे.
तालुक्यातील कृषी केंद्रामधून जादा दराने युरिया खताची विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले आहे. (वार्ताहर)