विद्यार्थी घडविण्याची किमया शिक्षकांमध्ये !

By Admin | Updated: April 8, 2017 00:55 IST2017-04-08T00:55:38+5:302017-04-08T00:55:38+5:30

विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याची किमया गाव पातळीवरील शिक्षकच करु शकतो. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना खऱ्या जीवनाचे गमक असते.

Teacher's teachers in the form of student! | विद्यार्थी घडविण्याची किमया शिक्षकांमध्ये !

विद्यार्थी घडविण्याची किमया शिक्षकांमध्ये !

कल्याणकुमार डहाट : माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमीलन व सत्कार समारंभ
अर्जुनी-मोरगाव : विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याची किमया गाव पातळीवरील शिक्षकच करु शकतो. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना खऱ्या जीवनाचे गमक असते. पूर्वी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी शाळेमध्ये उपलब्ध नसताना सुद्धा साधा भोळा शिक्षक विद्यार्थ्यांचे जीवन फुलविण्याचे काम प्रामाणिकपणे करायचा. आज आपण मोठ्या पदावर आहोत हे त्या प्राथमिक शिक्षकांच्या पुण्य प्रतापाचे फळ आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून लखलखणारा तारा घडविण्याचे महान कार्य एक शिक्षकच करु शकतो, असे प्रतिपादन गोठणगाव प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी तथा गोरेगावचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले.
गोठणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन व सत्कार सभारंभात ते अध्यक्षस्थानावरून तसेच माजी विद्यार्थी म्हणून हितगूज साधताना बोलत होते. कार्यक्रमाला सत्कारमुर्ती माजी विद्यार्थी वैद्यकीय अधिकारी डॉ. चिंतामन टेंभुर्णे, सेवानिवृत्त शाखा अभियंता मोरेश्वर टेंभुर्णे, सरपंच शकुंतला वालदे, डॉ. चांदेकर, उद्योगपती संतोष राठी, वनपाल ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य पतिराम राणे, सरिता महाजन, जयश्री बाळबुद्धे, प्रिती बन्सोड, समाजसेविका ईखार, संतोष निखारे, दीपक राणे, दीपक राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना डहाट यांनी, आज शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. गावातील शाळा ही गुणवंत विद्यार्थी घडविण्यात मागे पडत नाही. ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची गरज आहे. त्याचप्रमाणे मानवी मनाला अभ्यासाची नितांत गरज आहे. वयाच्या २० व्या वर्षापर्यंत ज्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिले तर पुढील ४० वर्ष सुखकारक जातील. मराठी जि.प. शाळा आजघडीला खाजगी शाळेच्या तुलनेत कुठेही कमी नाही, असे त्यांनी आवर्जुन सांगितले.
डॉ. टेंभुर्णे यांनी, आपल्या शालेय जीवनातील आठवणींची ओळख करुन विद्यार्थ्यांना अभ्यासाप्रती प्रेरित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बालपणापासून योग्य मार्गदर्शन लाभले तर निश्चितच तो विद्यार्थी गरुड झेप घेण्यास मागे पडणार नाही. संचालन डी.एस. कापगते यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी मांडले. आभार प्रा.डी. सेलोकर यांनी मानले.
कार्यक्रमाला गावातील पालकवर्ग बहुसंख्येनी उपस्थित होता. (शहर प्रतिनिधी)

डहाट व टेंभूर्णे यांचा सत्कार
गोठणगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेत शिकून उच्च पदावर विराजमान असलेले तहसीलदार डहाट व तिरोड्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. टेंभुर्णे, इंजि.मोरेश्वर टेंभुर्णे यांचा शाळा समितीच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, आपण ज्या शाळेत बालपण घालविले त्याची कृतज्ञता म्हणून तहसीलदार डहाट यांनी रोख १० हजार तर डॉ. टेंभुर्णे यांनी ५ हजारांची शाळेला देणगी दिली.

 

Web Title: Teacher's teachers in the form of student!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.