लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांच्या नेतृत्त्वात १८ जूनपासून मुंबई येथील आझाद मैदानावर हजारो शिक्षकांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यातील पाच हजाराहून अधिक शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार शिक्षकांनी केला आहे.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त खाजगी विना अनुदानित, अंशत: अनुदानित, १०० टक्के अनुदानित शाळेत विना अनुदानित तुकड्यांवर काम करणारे, १०० टक्के अनुदानित तुकड्यांवर अर्धवेळ काम करणारे अशा शिक्षकांना आणि नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्ती झालेल्या हजारो शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनपासून वंचित ठेवले आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षण संघर्ष संघटना गेल्या कित्येक वर्षांपासून लढा देत आहेत. मात्र शासनाने त्यांच्या मागण्यांची अद्यापही दखल घेतली नाही. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाºया शिक्षकांप्रती शासनाची असलेली उदासीनता भविष्यात चांगली पिढी घडविण्याच्या मार्गात अडसर ठरत असल्याची भावना शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. पेन्शनचा संबंध १०० टक्के अनुदानाशी जोडून शासन हजारो अन्यायग्रस्त शिक्षक कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याशी खेळत आहे. शासनाने या संवेदनशील प्रश्नाला गांभीर्याने न घेतल्याने मंगळवार १८ जूनपासून शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याध्यक्षा संगिता शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील हजारो अन्यायग्रस्त शिक्षक कर्मचाऱ्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे.या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण संघर्ष संघटना व पदाधिकारी व हजारो शिक्षक कर्मचारी रवाना झाले आहेत.
जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचे उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:04 IST
शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांच्या नेतृत्त्वात १८ जूनपासून मुंबई येथील आझाद मैदानावर हजारो शिक्षकांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यातील पाच हजाराहून अधिक शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचे उपोषण सुरू
ठळक मुद्देजिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांचा सहभाग : मागण्या मंजूर करण्याची मागणी