शिक्षक कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त ठरवू नये
By Admin | Updated: October 3, 2014 01:51 IST2014-10-03T01:51:02+5:302014-10-03T01:51:02+5:30
जिल्ह्यातील शाळांची कर्मचारी मान्यता सूची २०१३-१४ मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षक व शिक्षकेतरांनी अतिरिक्त ठरविण्यात येवू नये ..

शिक्षक कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त ठरवू नये
गोंदिया : जिल्ह्यातील शाळांची कर्मचारी मान्यता सूची २०१३-१४ मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षक व शिक्षकेतरांनी अतिरिक्त ठरविण्यात येवू नये व त्याबाबतचे निर्णय त्वरित कळविण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा गोंदियाच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्य) यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षाची सूची मान्यता त्यापुढील सन २०१४-१५ च्या प्रथम सत्राच्या सुलै महिन्याच्या शेवटी दिलेली आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सन २०१३-१४ व आजपर्यंतचे संपूर्ण वेतन अनुदान मान्यता सूची नसताना मंजूर करून देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे पद आपोआप मंजूर व नियमित झाले आहे. सदर व्यक्तींनी आपला कार्यभार पूर्ण केला आहे. खासगी मान्यता प्राप्त अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतरांचे वेतन अनुदान मंजूर करताना केवळ मंजूर पदांचेच वेतन अनुदान मंजूर करण्यात येत असते. त्यामुळे आता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविणे कायदेशिर ठरू शकत नाही, अशी धारणा सदर कर्मचाऱ्यांची आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात शाळांनी त्यांच्या स्तरावर अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतरांची यादी तयार करावी व आपल्याच स्तरावर समायोजन करावे, असे नमूद केले आहे. परंतु शिक्षक व शिक्षकेतरांना अतिरिक्त ठरविणे व त्यांचे समायोजन करण्याचे अधिकार महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार मुख्याध्यापक व संस्थाचालकांना नसून शिक्षण विभागास असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे. त्यामुळे संदर्भित सूची मान्यता सन २०१३-१४ त्वरीत रद्द करण्यात यावी. सन २०१२-१३ चीच सूची मान्यता कायम ठेवून नवीन नियम, कायदा व धोरणांचा अवलंब सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा तसेच शिक्षण सेवकांसह कोणत्याही शिक्षक व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवू नये, अशी मागणी परिषदेने केली आहे.