पाच महिन्यांत करावी लागणार ११ कोटींची करवसुली
By Admin | Updated: October 18, 2014 01:37 IST2014-10-18T01:37:47+5:302014-10-18T01:37:47+5:30
आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या नगर पालिकेला कर स्वरूपातून होणाऱ्या आवकचा मुख्य हातभार लागतो.

पाच महिन्यांत करावी लागणार ११ कोटींची करवसुली
गोंदिया : आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या नगर पालिकेला कर स्वरूपातून होणाऱ्या आवकचा मुख्य हातभार लागतो. मात्र मागील सहा महिन्यांत पालिकेच्या कर विभागाने फक्त एक कोटी आठ लाख ५४ हजार ४६७ रूपयांची कर वसूली केली आहे.
मागील कित्येक वर्षांपासून शहरवासीयांकडे सात कोटी १५ लाख ६६ हजार १३३ रू पये थकून आहेत. तर सन २०१४-१५ या चालू वर्षात तीन कोटी ९४ लाख ३६ हजार ३९५ रूपयांचा कर आकारण्यात आला आहे. अशाप्रकारे पालिकेच्या कर विभागाला या पाच महिन्यांच्या कालावधीत ११ कोटींची वसूली करायची आहे. तर विभागाला एवढी रक्कम वसूल करणे शक्य नसल्याचे ठाऊक असल्याने त्यांनी सहा कोटी वसूल करण्याचे उद्दीष्ट पुढे ठेवले आहे.
राजकीय हस्तक्षेप म्हणा की शहरवासीयांची अनास्था पालिका कर वसूलीत फेल ठरते. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षातही कर विभागाला पाहिजे तशी वसूली करता आली नाही. तर सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आल्याने कर विभागातील कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. शिवाय आता विधानसभेच्या निवडणुका आल्या व कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी लागल्याने हा काळही त्यांच्या हातून गेला.
परिणामी कर विभागाने एप्रिलपासून अद्याप एक कोटी आठ लाख ५४ हजार ४६७ रूपयांचीच कर वसूली केली.
पालिकेच्या कर विभागात सुमारे २५ कर्मचारी असून त्यांच्यावर शहरातील ४० वॉर्डांतील वसूली करण्याची जबाबदारी आहे. काही कर्मचाऱ्यांना तर तीन वॉर्डांतील वसूली करावी लागते. या व्यतीरिक्त त्यांना कार्यालयीन कामे करावी लागतात.
त्यात निवडणुका आल्यास वेगळीच फसगत होते व तोच प्रकार या वर्षात घडला. परिणामी पाहिजे तशी वसूली करता आली नाही. त्याचा परिणाम अनुदानावर होण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)