कर वसुलीचे नियोजन शून्य
By Admin | Updated: December 1, 2015 05:49 IST2015-12-01T05:49:01+5:302015-12-01T05:49:01+5:30
यंदा पालिकेला ९ कोटी ६५ लाख ४१ हजार ९९२ रूपयांच्या कर वसुलीचे टार्गेट आहे. उरलेल्या चार महिन्यांत

कर वसुलीचे नियोजन शून्य
गोंदिया : यंदा पालिकेला ९ कोटी ६५ लाख ४१ हजार ९९२ रूपयांच्या कर वसुलीचे टार्गेट आहे. उरलेल्या चार महिन्यांत पालिकेला हे उद्दिष्ट पूर्ण करायचे असल्याने त्या दृष्टीने त्यांची तयारी अपेक्षित आहे. मात्र कर वसुली विभागाला संगणकीकरणाचे काम डोकेदुखीचे ठरत. आतापर्यंत डाटा दुरूस्तीचे काम सुरू असून बिलींग झालेली नाही. यातून कर वसुलीचे नियोजन शून्य दिसून येत असून हाच प्रकार त्यांना भोवणार यात शंका नाही.
पालिकेला आजघडीला ५ कोटी ५१ लाख सात हजार ११६ रूपये थकीत ४ कोटी १४ लाख ३४ हजार ८७६ रूपये चालू (सन २०१५-१६) अशाप्रकारे एकूण ९ कोटी ६५ लाख ४१ हजार ९९२ रूपयांची कर वसुली करावयाची आहे. यात पालिकेने एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांच्या काळात ७४ लाख ४ हजार २१४ रूपये थकीत व ४० लाख १५ हजार ७८७ रूपये चालू अशी एकूण १ कोटी १४ लाख २० हजार १ रूपयांची वसुली केली आहे. येथे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कर वसुलीचे टार्गेट कमीच आहे.
त्यात मुख्याधिकाऱ्यांनी नुकतीच कर वसुली विभागाची बैठक घेऊन त्यांना टार्गेट पूर्ण करण्याचे आवाहन केले. यासाठी त्यांनी स्वत: मैदानात उतरणार असल्याचीही तयारी दर्शविल्याची माहिती आहे. आता कर वसुली विभागाकडे चार महिन्यांचा कालावधी उरला आहे. या चार महिन्यांत विभागाला टार्गेट पूर्ण करायचे असल्याने त्यांची तयारी असली पाहिजे. मात्र कर वसुली विभाग आताही यासाठी सज्ज नसल्याचे दिसते. कारण कर वसुली विभागातील डाटा संगणकीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
विभागातील सहायक कर निरीक्षक उपेंद्र धामनगे डाटा फिडींग झाली असून त्याची दुरूस्ती सुरू असल्याचे सांगत आहेत. यात एकाच वॉर्डाची दुरूस्ती झाल्याचेही त्यांच्याकडून कळले.
अशात उर्वरित ३९ वॉर्डांचा डाटा दुरूस्त कधी होणार, त्यांचे बिलींग कधी होणार व कधी त्यांची वाटणी होणार असा प्रश्न येथे पडतो. यामुळे येथेच कर वसुली विभागाचा नियोजनशून्य कारभार पुढे येतो. कर वसुलीवरच पालिकेचा कारभार चालतो.
शिवाय शासनाकडून येणाऱ्या अनुदानासाठी जास्तीत जास्त कर वसुली होणे गरजेचे आहे. येथे मात्र कर वसुली विभागच अद्याप तयार नसल्याने ऐन वेळी मात्र धांदली होणार यात शंका नाही.
कर वसुलीसाठी विभागाचे नियोजन शून्य असल्याने याचा परिणाम कर वसुलीवर पडणार याची शक्यताही नाकारता येत नाही. (शहर प्रतिनिधी)
बिलिंग अद्याप झालेली नाही
४डाटा फिडिंगच्या कामाचे काय झाले ते विभागालाच ठाऊक. मात्र बिलिंग अद्याप एकाही वॉर्डाची झालेली नाही. आता जेमतेम एका वॉर्डातील डाटा दुरूस्ती झाली असल्याने उर्वरित ३९ वॉर्डांच्या डाटा दुरूस्तीला आणखी वेळ लागणार यात शंका नाही. मात्र या कामात चांगलीच लेटलतीफी झाली हे दिसूनच येत आहे. सर्व वॉर्डांच्या डाटातील दुरूस्ती झाल्यावरच सर्वांचे बिलिंग केले जाणार. मात्र याला किती वेळ लागणार हे सांगता येत नाही.