११ दिवसांत ३८ लाखांची करवसुली
By Admin | Updated: January 31, 2015 23:23 IST2015-01-31T23:23:03+5:302015-01-31T23:23:03+5:30
कर वसुलीचे ११ कोटींचे टार्गेट घेऊन सुरू करण्यात आलेल्या नगर परिषदेच्या कर वसुली मोहिमेला शहरात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच कर वसुली पथकाने

११ दिवसांत ३८ लाखांची करवसुली
गोंदिया : कर वसुलीचे ११ कोटींचे टार्गेट घेऊन सुरू करण्यात आलेल्या नगर परिषदेच्या कर वसुली मोहिमेला शहरात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच कर वसुली पथकाने ११ दिवसांत ३७ लाख ५९ हजार ४९५ रूपयांची कर वसुली केली आहे. यात रोख व धनादेश स्वरूपात आलेल्या रकमेचा समावेश आहे.
परिषदेच्या कर वसुली पथकाने १९ जानेवारीपासून कर वसुली मोहीमेला सुरूवात केली. सुरूवातीच्या काही दिवसांत शहरातील थकबाकीदारांकडून याला विरोध करण्यात आला. काही ठिकाणी तर हमरीतुमरीची परिस्थितीही निर्माण झाली होती. मात्र पालिकेने यंदा टार्गेट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली असून विरोध करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी दर्शविली. तर काही व्यापाऱ्यांच्या दुकानांना सील ठोकण्या पर्यंतची वेळ आली. यावर मात्र व्यापाऱ्यांनी नमते घेत आपल्याकडील थकीत रक्कम भरून दुकानाला सील लावण्याची पाळी टाळली.
आता मात्र कर वसुली मोहीमेला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच दिवसेंदिवस कर वसुलीचा आकडा वाढतच चालल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मुख्याधिकारी सुमंत मोरे स्वत: कर वसुलीसाठी मैदानात उतरले असून पथकासोबत वसुलीसाठी जात आहेत. तर शहरातील तीन प्रतिष्ठीत ठिकाणांवर थकीत रक्कम भरण्यासाठी टोलवाटोलवी केली जात असल्याने पथकाने सील लावण्याची तयारी केली. मात्र पथक पोकळ धमक्या न देता खरोखरच सील लावत असल्याचे दिसून आल्याने अखेर समोरच्यांनी रक्कम भरून आपले सील लावण्याची कारवाई टाळली. सील लावण्यात येत प्रकार कानी पडत असल्यानेहीथकबाकीदारांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)