नक्षलग्रस्त भागात टॉवर्सचे काम थंड
By Admin | Updated: November 11, 2015 01:20 IST2015-11-11T01:20:04+5:302015-11-11T01:20:04+5:30
शासकीय दूरभाष सेवेसाठी नेहमीच बीएसएनएलकडे मोठ्या आशेने पाहिले जाते.

नक्षलग्रस्त भागात टॉवर्सचे काम थंड
९ टॉवर्स प्रलंबित : बीएसएनएलला नक्षल्यांची भीती
गोंदिया : शासकीय दूरभाष सेवेसाठी नेहमीच बीएसएनएलकडे मोठ्या आशेने पाहिले जाते. शासनाच्या प्रस्तावानुसार जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागासाठी १७ टॉवर्स मंजूर करण्यात आले आहेत. याला दोन वर्षाचा कालावधी लोटला. मात्र त्यापैकी आठ टॉवर्स सुरू करण्यात आले असून उर्वरित टॉवर्स ‘इन प्रोसेस’ असून येत्या तीन-चार महिन्यांत सुरू होतील, असे बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यात एकूण ९५ टॉवर्स आहेत. यापैकी गोंदिया शहरात १४ मोबाईल टॉवर्स आहेत. मागील तीन वर्षांच्या कालावधीत गोंदिया शहरात तीन मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले आहेत. थ्रीजी सेवेसाठी तिरोडा शहरात एक टॉवर नुकताच उभारण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात केवळ गोंदिया व तिरोडा या दोन ठिकाणी थ्री-जी सेवा सुरू करण्यात आली असून इतर ठिकाणी टू-जी सेवाच आहे. गोंदियात थ्रीजीसेवेचा एक टॉवर आहे.
जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी १७ मोबाईल टॉवर्स असून यापैकी केवळ आठ टॉवर्स सुरू स्थितीत आहेत. तर उर्वरित टावर्सचे काम प्रगतीपथावर असून येत्या काही महिन्यांत उर्वरित नऊ टॉवर्स सुरू होणार आहेत. अर्जुनी-मोरगाव येथे टॉवरचे काम सुरू असून तेथे लवकरच थ्रीजी सेवा उपलब्ध होणार असल्याचे बीएसएनएलकडून सांगण्यात आले आहे.
मागील तीन वर्षापूर्वी दर्रेकसा येथील मोबाईल टॉवर नक्षलवाद्यांनी जाळले होते. ते टॉवर पूर्ववत सुरू होण्याच्या स्थितीत नाही. तरीसुद्धा तेथे अद्याप नवीन टॉवर सुरू करण्यात आले नाही. याबाबत विचारण्या केली असता वरिष्ठ पातळीवरून दर्रेकसा येथील टॉवरबाबत अद्याप काहीही आदेश न आल्याने ते ‘जैसे थे’ स्थितीत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
वास्तविक छत्तीसगड सीमेकडील दरेकसा, सालेकसा परिसरात तसेच देवरी तालुक्यातील छत्तीसगड, गडचिरोलीकडील भागात मोबाईलचे नेटवर्क नसते. त्यामुळे नागरिकांना संपर्क करताना मोठी अडचण जात आहे. याकडे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.