गोंदियातील कामांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा
By Admin | Updated: August 27, 2015 02:01 IST2015-08-27T02:01:07+5:302015-08-27T02:01:07+5:30
गोंदिया जिल्ह्यातील आणि विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित विकास कामांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेतली.

गोंदियातील कामांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा
समीक्षा बैठक : अग्रवाल यांचा पुढाकार
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील आणि विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित विकास कामांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेतली. यावेळी आ.गोपालदास अग्रवाल यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी आणि इतर अधिकारीगण उपस्थित होते.
शहरातील पूर्व बायपाससाठी २५ कोटी रुपये निधी देण्यास यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यासोबतच शहरातील बहुचर्चित भूमिगत गटार योजनेला लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच शहरातील नवीन वसाहतीत अतिरिक्त पाणी पुरवठा पाईपलाईनसाठी १० कोटी रुपये निधी, गोंदिया तालुक्यातील पूरग्रस्त कासा, पुजारीटोला गावांच्या पुनर्वसन कार्यक्रमाला मंजुरी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
गोंदिया नगर परिषदेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यातील ६ नगर पंचायतींमध्ये येथील कर्मचाऱ्यांना समायोजित करण्याचे निर्देश नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत प्रस्तावित मेडिकल कॉलेज सुरू करणे, नर्सिंग कोर्स महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक पदांना मंजुरी, समाजभवन, प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक निधी देण्याचे आश्वासनही देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डांगुर्ली बांधाच्या कामाला गती देण्यासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन अंतिम मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्यपालांना भेटून बहुप्रतीक्षित नवेगाव-देवरी उपसा सिंचन योजनेच्या कामाला अंतिम मंजुरी देण्याबद्दलही चर्चा झाली. (जिल्हा प्रतिनिधी)