अर्णब गोस्वामींविरोधात कडक कारवाई करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST2021-01-23T04:30:00+5:302021-01-23T04:30:00+5:30
गोंदिया : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थी दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटमधून अनेक गंभीर बाबी ...

अर्णब गोस्वामींविरोधात कडक कारवाई करा ()
गोंदिया : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थी दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषत: पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामींना घटनेच्या ३ दिवस आधीच होती, असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामींकडे कशी आली? देशाच्या संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून अर्णब गोस्वामींवर कडक कारवाई करा अशी मागणी जिल्हा कॉँग्रेस कमिटीने केली असून यासाठी शुक्रवारी (दि.२२) आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
या व्हॉट्सॲप चॅटवरून अर्णब गोस्वामी यांचे पंतप्रधान व गृहमंत्री यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध असून त्यांनी अर्णब यांना नियमाच्या पलीकडे जाऊन व्यावसायिक मदत केली असल्याचे स्पष्ट आहे. त्यासोबतच पुलवामा हल्ला हा मोठ्या व्यक्तीच्या फायद्याचा आहे, तो निवडणूक जिंकेल असा उल्लेखही चॅटमध्ये आहे. त्यामुळे भाजप निवडणूक जिंकेल असा उल्लेखही या चॅटमध्ये आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलिदानाचा वापर केला का? याचे उतरही केंद्र सरकारने दिले पाहिजे. अर्णब गोस्वामी आणि केंद्रातील भाजप सरकारचे साटेलोटे हा माध्यम स्वातंत्र्य आणि देशाची सुरक्षा आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. या सर्व प्रकरणात एकमात्र अर्णब गोस्वामीच दोषी नाही तर केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आपण घेतलेल्या शपथेचा भंग करुन गोस्वामीचा व्यावसायिक फायदा करून दिल्याचे तसेच त्याला कायद्याच्या कचाट्यातून वाचविण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. हासुद्धा राष्ट्रद्रोहाचाच भाग असून या प्रकरणात गोस्वामीला मदत करणाऱ्या उच्चपदस्थांवरदेखील तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी जिल्हा कॉँग्रेस कमिटीने शुक्रवारी (दि.२२) धरणे आंदोलनातून केली. याप्रकरणी दोषीवर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना निवदेन देण्यात आले आहे.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ.एन.डी. किरसान, सचिव विनोद जैन, सचिव अमर वऱ्हाडे, सूर्यप्रकाश भगत, जहीर अहमद, पी.जी.कोरे, अनिलकुमार गौतम, अशोक गुप्ता, योगेश अग्रवाल, निकेश मिश्रा, प्रभा उपराडे, देवका वरखडे, चमनलाल बिसेन, पप्पू पटले, गंगाराम बावणकर, श्याम गणवीर, रणजीत गणवीेर, आशिष नागपुरे, बलपीतसिंग बग्गा, राजेंद्र डहाट, नीलम हलमारे, अमर राहुल, शैलेश जायस्वाल, आनंद लांजेवार, सुशील खरवडे आदींचा समावेश होता.