Take note of the problems of rural hospitals | ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांची घेतली दखल

ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांची घेतली दखल

ठळक मुद्देजिल्हा शल्यचिकित्सकांची भेट : गावकऱ्यांशी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : येथील तालुका ग्रामीण रूग्णालय विविध समस्यांचे माहेरघर आहे. रुग्णालयात अनेक सोयी सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. तसेच रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव होता.यासंबंधीचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच त्याची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला.
आमगाव तालुका दुर्गम आणि आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची धुरा याच ग्रामीण रुग्णालयावर आहे. मात्र या रूग्णालयात भौतिक असुविधा, वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव असून बरेचदा औषधसाठा उपलब्ध नसतो. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागतात. याचा त्यांना आर्थिक भूर्दंड बसत होता. ग्रामीण रुग्णालयातील अवस्थेबाबत वृत्त प्रकाशित होताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके हे बाह्यरूग्ण विभागाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज राऊत यांच्यासह आमगाव ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी कर्मचाºयांना कार्यालयीन वेळेत रुग्णालयात उपस्थित राहावे, भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. औषधांचा वेळेवर पुरवठा करण्यात येईल. रुग्णांची गैरसोय झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
या रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टरांची दोन पदे रिक्त असून ती भरल्यास रुग्णांची गैरसोय टाळण्यास मदत होईल. अशी मागणी सुध्दा या वेळी गावकºयांनी केली.

Web Title: Take note of the problems of rural hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.