शहर स्वच्छ बनविण्यासाठी पुढाकार घ्या
By Admin | Updated: August 11, 2015 02:26 IST2015-08-11T02:26:04+5:302015-08-11T02:26:04+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारताचा संकल्प केला आहे. हा संकल्प प्रत्यक्षात आणून देशभर स्वच्छतेची मोहीम

शहर स्वच्छ बनविण्यासाठी पुढाकार घ्या
राजकुमार बडोले : क्लिन इंडियाचा गोंदिया येथे शुभारंभ
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारताचा संकल्प केला आहे. हा संकल्प प्रत्यक्षात आणून देशभर स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येत आहे. चांगल्या आरोग्यासाठी परिसर स्वच्छ असणे आवश्यक आहे. गोंदिया शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज ९ आॅगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन, नगर परिषद गोंदिया व सेवाभावी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्लिन इंडियाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
गोंदिया येथील स्व.जमनालाल बजाज पुतळ्याजवळ पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, नगर पालिकेचे मुख्याधिकारी जी.एन. वाहुरवाघ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ.घनश्याम तुरकर यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, गोंदिया शहराला लागलेला अस्वच्छतेचा शिक्का या निमित्ताने मिटविता येईल. सर्वांच्या सहकार्याने शहर स्वच्छ होण्यास मदत होईल. स्वच्छता असली तर आजार दूर पळतील. प्रत्येक आठवड्यात रविवारी वॉर्डातील नागरिकांनी एकत्र येवून वॉर्डाच्या स्वच्छतेसाठी काम करावे. आपले शहर स्वच्छ व सुंदर राहील याचा सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
मनोहर म्युनिसिपल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, मनोहर म्युनिसीपल हायर सेकेंडरी स्कुल, एस.एस. गर्ल्स हायस्कुल व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयक रॅली काढून अभियानात सहभाग घेतला.
उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, तहसीलदार संजय पवार, नगरसेवक, पोलीस विभागाचे अधिकारी, शहरातील विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, शाळा महाविद्यालयाचे शिक्षक यांची उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)