निराधारांच्या अर्जांवर त्वरित कार्यवाही करा
By Admin | Updated: September 26, 2015 01:54 IST2015-09-26T01:54:39+5:302015-09-26T01:54:39+5:30
संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना व कौटुंबीक अर्थसहाय्य योजनांचे अनेक प्रकरणे उपविभागीय कार्यालयात प्रलंबित आहेत.

निराधारांच्या अर्जांवर त्वरित कार्यवाही करा
अग्रवाल यांचे निर्देश : विविध योजनांचे प्रस्ताव प्रलंबित
गोंदिया : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना व कौटुंबीक अर्थसहाय्य योजनांचे अनेक प्रकरणे उपविभागीय कार्यालयात प्रलंबित आहेत. त्यावर सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश आ.गोपालदास अग्रवाल यांनी दिले. यात तहसीलदार पवार यांनी विशेष लक्ष देवून वेळेवर कारवाई करावी, असे निर्देश दिले.
बैठकीत तहसीलदार पवार यांनी सांगितले की, गोंदिया शहरातील आतापर्यंत मंजूर सर्व प्रकरणांत आॅगस्ट २०१५ पर्यंतच्या अनुदानाचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. तसेच चालू महिन्याच्या वाटपाची कार्यवाही सुरू आहे. यावर्षी संजय गांधी योजनेचे ११०, श्रावणबाळ योजनेचे १८७, राष्ट्रीय कौटुंबीक अर्थसहाय्य योजनेचे १६ प्रकरणे प्राप्त झाले आहेत. असे एकूण ३१३ प्रकरणे आहेत. यापैकी २२७ प्रकरणे मंजूर, २२ नामंजूर व ६४ प्रकरणांवर कार्यवाही केली जात आहे. तसेच गोंदिया ग्रामीण परिसरातून सदर कालावधीत आलेल्या आवेदनांपैकी प्रलंबित संजय गांधी निराधारचे ४५, श्रावणबाळचे ५९, राष्ट्रीय कौटुंबीक अर्थसहाय योजनेचे २७ प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे.
याप्रसंगी आ. अग्रवाल यांनी पुढील महिन्यात नवरात्र व दिवाळी पर्व लक्षात घेवून सर्व लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा १५ दिवसांच्या आत करावयास सांगितले.
या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गिरी यांना आ. अग्रवाल यांनी कामठा येथे तयार होणाऱ्या क्रीडा संकुलाबाबतही संपूर्ण माहिती घेवून समिक्षा केली.
बैठकीत उपविभागीय अधिकारी केएनके राव, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष पृथ्वीपालसिंग गुलाटी, पं.स. सभापती स्रेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, चमनलाल बिसेन, रजनी नागपुरे, गेंदलाल शरणागत, माजी न.प. सभापती सुनील भालेराव, शहर काँग्रेस अध्यक्ष अशोक चौधरी, लोकेश रहांगडाले, आशा जैन, जगतराय बिसेन, न.प. सदस्य व्यंकट पाथरू यांच्यासह इतर समित्यांचे सदस्य, तालुक्यातील तलाठी व नायब तहसीलदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)