पांढरीच्या ‘व्हिडिओ’वर कारवाई करा

By Admin | Updated: August 26, 2015 01:43 IST2015-08-26T01:43:40+5:302015-08-26T01:43:40+5:30

सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय पांढरी येथील ग्रामविकास अधिकारी (व्हिडिओ) एम.एस. रामटेके यांचा भोंगळ कारभार जनतेसमोर उघड झाला आहे.

Take action on 'white' video | पांढरीच्या ‘व्हिडिओ’वर कारवाई करा

पांढरीच्या ‘व्हिडिओ’वर कारवाई करा

कॅशबुक रेकॉर्ड अर्धवट : कारवाईसाठी गावकऱ्यांनी केली मागणी
पांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय पांढरी येथील ग्रामविकास अधिकारी (व्हिडिओ) एम.एस. रामटेके यांचा भोंगळ कारभार जनतेसमोर उघड झाला आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाली असून अद्याप कारवाई करण्यात आली नाही. याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
अशा प्रकारामुळे ग्रामपंचायत कार्यालयाला गावकऱ्यांद्वारे कुलूप लावण्यात आले होते. पंचायत समिती सडक अर्जुनी येथील उपखंडविकास अधिकारी झेड.बी. टेंभरे, नेताजी धारगावे, धमगाये, उगले व गावकऱ्यांच्या समोर सदर कुलूप उघडून चौकशी करण्यात आली. या प्राथमिक चौकशीमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्याने नऊ महिन्यांपासून कॅशबुक न भरल्याचे आढळले. तसेच रेकार्ड अर्धवट भरलेला असून अंदाजे पाच लाख रुपये उचल केल्याचे दिसून आले. या पाच लाख रूपयांचा हिशेबच त्यांच्याकडे नाही. तसेच सरपंच व सचिव रेकार्डवर न नोंदवताच पैशाची उचल करतात. अशाच प्रकारे आणखी पैशाची उचल करण्यात आली आहे, पण व्हाऊचर क्रमांक दोनवर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची सही नाही. त्यामुळे या प्रकारामध्ये मोठेच गौडबंगाल असल्याची शक्यता गावकरी वर्तवित आहेत.
मागील वर्षी सन २०१४ मध्ये १५ आॅगस्ट रोजी ग्रामसभेने महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड केली होती. मात्र मागील वर्षभरापासून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांचे कुठेही नाव नाही. त्यामुळे काही गावकऱ्यांना तर या समितीचे अध्यक्ष कोण आहेत, हेच कळत नाही. सदस्यांचे तर प्रोसिडींग बुकवर नावच नाही. अशाप्रकारे ग्रामविकास अधिकाऱ्यांचे निष्काळजी व हलगर्जीपणाचे कार्य सुरू असूनही त्यांची केवळ प्राथमिक चौकशीच करण्यात आली.
या चौकशीचा अहवाल येथील अधिकाऱ्यांनी खंडविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांना पाठविल्याची माहिती सांगितली जात आहे. मात्र अद्याप कसलीही कारवाई करण्यात आली नाही. सध्या सदर ग्रामविकास अधिकाऱ्यावर तीन लाख रूपयांची रिकव्हरी निघत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
सध्या ग्रामविकास अधिकारी रामटेके पंचायत समितीच्या मिटींगला उपस्थित न राहता पांढरी ग्रामपंचायतमध्ये रेकार्ड दुरूस्ती करताना दिसत आहेत. याचे मुख्य श्रेय पंचायत समिती सडक अर्जुनी येथील काही अधिकाऱ्यांवर जात आहे. त्यामुळे सदर अधिकाऱ्यांची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करून या परिसरातून स्थानांतरण करण्याची मागणी जोर पकडत आहे. आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: Take action on 'white' video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.