बेजबाबदार ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST2021-02-10T04:29:14+5:302021-02-10T04:29:14+5:30
बिरसी-फाटा : घरकुलाच्या प्रपत्र ‘ड’ ची यादी विहित मुदतीत तयार न केल्याने आता कित्येकांना घरकुलाच्या लाभापासून वंचित रहावे लागणार ...

बेजबाबदार ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा ()
बिरसी-फाटा : घरकुलाच्या प्रपत्र ‘ड’ ची यादी विहित मुदतीत तयार न केल्याने आता कित्येकांना घरकुलाच्या लाभापासून वंचित रहावे लागणार आहे. अशात प्रपत्र ‘ड’ च्या सर्वेक्षणात कर्तव्य कुचराई व बेजबाबदारपणे कार्य करण्याऱ्या ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत मुंडीकोटा येथील सरपंच कमलेश आथिलकर सोमवारपासून (दि.८) पंचायत समितीसमोर उपोषणाला बसले आहेत.
सरकारच्या ध्येयधोरणानुसार हीन-दीन, गरीब, अति गरजू व गरजू लोकांना घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून प्रपत्र ‘ड’ ची यादी तयार करण्यात आली होती. प्रत्येक गरजवंताला हक्काच्या निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी प्रपत्र ‘ड’ यादी तयार करण्याचे कार्य ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांची स्थान बदली करून यादी तयार करण्यात आली. प्रपत्र ‘ड’ ची यादी विहित मुदतीत तयार करून विहित वेळेत त्यांचे ऑनलाइन करण्याचे धोरण होते. हे कार्य विहित मुदतीत पूर्ण होऊ न शकल्याने गावचे गाव घरकुलाच्या लाभापासून वंचित होणार आहे. विशेष म्हणजे, अनेकांच्या नावाचा समावेश घरकुलाचे प्रपत्र ‘ड’ च्या यादीत नसल्याने सरपंचांनी आपले नाव कापले असा प्रचार-प्रसार होत असल्याने अनेक सरपंचांना जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सर्वच जबाबदारी असलेले ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी यांची कर्तव्य कुचराई व बेजबाबदारपणा सरपंचांना भोगावा लागत असून भविष्यात देखील भोगावा लागणार आहे. यामुळे प्रपत्र ‘ड ’च्या सर्वेक्षणात कर्तव्य कुचराई व बेजबाबदारीने कार्य करण्याऱ्या ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. त्यांच्या वेतन व भविष्य निर्वाह निधीतून लाभ देण्यात यावा. तसेच सर्वेक्षणात पात्र असूनही ऑनलाईन होऊ न शकलेल्या लाभार्थ्यांचा प्रपत्र ‘ड’ च्या यादीत समावेश करण्यात यावा अशी मागणी आथिलकर यांनी केली असून यासाठी ते सोमवारपासून तिरोडा येथील खंड विकास अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला महेन्द्र भांडारकर, प्रदीप नशिने, अजय नंदागवळी, युवराज रेवतकर यांनी भेट दिली होती.