दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By Admin | Updated: March 14, 2015 01:22 IST2015-03-14T01:22:02+5:302015-03-14T01:22:02+5:30

अनेक बाबतीत एसटी महामंडळाकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. तिकीटच्या दरापासून तर इतर अनेक बाबतीत होणाऱ्या या लुटीला आळा...

Take action against the guilty officers | दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा

लूट प्रवाश्यांची
भाग-१
देवरी : अनेक बाबतीत एसटी महामंडळाकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. तिकीटच्या दरापासून तर इतर अनेक बाबतीत होणाऱ्या या लुटीला आळा घालण्यासाठी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच जागृत होऊन प्रवासीभिमुख सेवा देण्याची अपेक्षा जागरूक प्रवाशांकडून केली जात आहे.
गोंदिया ते आमगावच्या जुन्या बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशाकडून ३२ रुपये व नवीन बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशाकडून ३८ रुपये भाडे आकारण्यात यावे व या दोन्ही थांब्यावरून गोंदियाला जाणाऱ्या प्रवाशांकडून इतकेच भाडे आकारावे, असा राप मंडळाचा नियम आहे. मात्र गोंदिया आगाराच्या बसेसमध्ये ३८ रूपये एकच भाडे आकारण्यात येत आहे. ही बाब राप मंडळाच्या नियमाबाहेर असून प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे ६ रूपये जास्तीचे घेवून सरळ लुट करण्यात येत आहे.
याबाबतची तक्रार सर्वप्रथम २ सप्टेंबर २०१४ रोजी देवरीचे नागरिक नरेश जैन यांनी विभागीय नियंत्रक भंडारा व आगार प्रमुख गोंदिया यांना केली होती. मात्र प्रत्युत्तर न मिळाल्याने अनेकदा तक्रारी भंडारा व आगार प्रमुख गोंदिया यांच्याकडे केल्या. २ डिसेंबर २०१४ रोजी विभागीय नियंत्रक भंडारा यांनी त्यांच्या पत्रानुसार (राप/विनी/मं/वाह/चालन०२३९७) नियमानुसार भाडे आकारणी करण्यात आल्याचे लेखी कळविले. मात्र नरेश जैन यांचे समाधान झाले नव्हते. त्यामुळे नरेश जैन यांनी गोंदिया आगारातून गोंदिया ते ककोडी व गोंदियापर्यंतच्या बसेसचा तिकीट दर व त्यांचे टप्पे यांची माहिती मागवून पूर्ण अभ्यास केला. तेव्हा निदर्शनास आले की, वेगवेगळ्या आगाराच्या परंतु एकाच मार्गावर धावणाऱ्या बसेसमध्ये वेगवेगळे भाडे आकारणी करण्यात येत आहे. परंतु राप मंडळाच्या नियमानुसार एकच भाडे आकारणे गरजेचे आहे. अनेकदा गोंदिया आगाराच्या एकच मार्गावर धावणाऱ्या वेगवेगळ्या शेड्युलच्या बसेसमध्ये तिकीट दरात तफावत होत आहे. जर गोंदिया-देवरी-गोंदिया भाडे आकारणीत संशोधन करण्यात आले तर देवरी ते आमगावपर्यंतचेच नव्हे तर गोंदियापर्यंतचे तिकीट दर निश्चितच कमी होवू शकते. नरेश जैन यांनी वारंवार गोंदिया आगाराच्या बसेसमध्ये तिकीट दरात नियमाप्रमाणे सुधारणा करण्याबाबद आगार प्रमुख गोंदिया, विभाग नियंत्रक भंडारा व प्रादेशिक व्यवस्थापक नागपूर यांना लेखी पत्र देवून तथा प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयात भेटूनसुध्दा सर्वच अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
राप महामंडळाचे अधिकारी सर्व नियम धाब्यावर ठेवून आपल्या मर्जीनुसार तिकीट दर कमी-जास्त करून प्रवाशांना सर्रासपणे लुटत आहेत. जैन यांनी विभाग नियंत्रक भंडारा यांच्याकडून गोंदिया ते ककडीपर्यंतचा दरपत्रक (टप्पेवारीसह) मागितल्यावर सदर माहिती समोर आली आहे. २२ आॅगस्ट २०१४ पासून राप मंडळाव्दारे भाडेवाढ करण्यात आलेली असून तेव्हापासून हे जास्तीचे भाडे प्रवाशाकडून लुटले जात आहे. या लुटीच्या मागे अधिकारी वर्गाचे मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रवाशांकडून जास्तीचे तिकीट दर आकारून गोंदिया आगाराला नफ्यात आणण्याचे मोठे षडयंत्र असल्याचे बोलले जात आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नरेश जैन यांनी राज्य शासनाचे परिवहन मंत्री यांना केली असून प्रवाशांना होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून वाचविण्याची मागणीसुद्धा केली आहे. (प्रतिनिधी)
वेगवेगळ्या आगारांच्या बसेसचे वेगवेगळे भाडे
गडचिरोली आगार तथा साकोली आगाराच्या बसमध्ये देवरी ते आमगावची भाडे आकारणी ३८ रूपये होत होती. तर गोंदिया आगाराच्या बसमध्ये ४४ रूपये भाडे घेण्यात येत असल्यामुळे या भाडे फरकाबाबतसुध्दा लेखी तक्रार करण्यात आली. त्वरितच विभागीय नियंत्रक भंडारा यांनी साकोली आगाराच्या बसचे भाडे वाढवून ४४ रूपये केले. तसेच गडचिरोली आगाराच्या बसमध्ये देवरी ते गोंदियाचे भाडे ६९ रूपये तर गोंदिया आगारच्या बसमध्ये ७६ रूपये भाडे आकारणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे विभागीय नियंत्रक भंडारा यांनी आगार व्यवस्थापक गडचिरोली यांना दोन्ही ठिकाणचे भाडे वाढविण्यास सांगितल्यावरसुध्दा त्यांनी भाडेवाढ केली नाही. उलट नरेश जैन यांना आमचे भाडे बरोबर असल्याचे लेखी कळविले आहे.
दरपत्रकापेक्षा आकारले जाते अधिकचे भाडे
नरेश जैन यांनी देवरी ते आमगावपर्यंतच्या पूर्ण गावांचा सर्व्हे केला. त्यात राप मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या चुका लक्षात आल्या. गोंदिया आगारच्या बसेसमध्ये पदमपूर ते आमगावचे तिकीट दर ६ रूपये ऐवजी ९ रूपये आकारण्यात येत आहे. देवरी ते अंजोराचे भाडे २८ रूपये बरोबर आकारण्यात येत असून नंतर पुढील गाव बोरकन्हार मात्र ३ किमी अंतरावर असून तेथील भाडे ३८ रूपये आकारण्यात येत आहे. जैन यांच्या मते हे भाडे ३२ रूपये आकारण्यात यायला हवे. आमगाव ते लोहाराचे भाडे २८ रूपये आकारण्यात येत आहे. परंतु लोहारा ते मुल्लाचे अंतर २ किमी असून ३२ रूपये आकारायला हवे, परंतु ३८ रूपये भाडे घेण्यात येते व सहा रूपये अधिक घेतले जाते.

Web Title: Take action against the guilty officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.