घरकुल लाभार्थ्याच्या नावावर पैशाची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:55 PM2019-06-13T23:55:08+5:302019-06-13T23:56:02+5:30

घरकुल लाभार्थ्याच्या नावावर खोटे कागदपत्रे आणि फोटो अपलोड करुन तब्बल १ लाख २ हजार ८६ रुपयांची उचल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तिरोडा तालुक्यातील डब्बेटोला येथे उघडकीस आला आहे.

Tackle money in the name of the beneficiary | घरकुल लाभार्थ्याच्या नावावर पैशाची उचल

घरकुल लाभार्थ्याच्या नावावर पैशाची उचल

googlenewsNext
ठळक मुद्देतिरोडा तालुक्यात घरकुल योजनेत घोळ : माहितीच्या अधिकारात उघड : लाभार्थ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, खोटे फोटो केले अपलोड

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : घरकुल लाभार्थ्याच्या नावावर खोटे कागदपत्रे आणि फोटो अपलोड करुन तब्बल १ लाख २ हजार ८६ रुपयांची उचल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तिरोडा तालुक्यातील डब्बेटोला येथे उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ज्या लाभार्थ्याच्या नावावर या पैशाची उचल करण्यात आली त्यांनी यासंबंधीचे कागदपत्रे माहितीच्या अधिकारांतर्गत मागविल्यानंतर हा प्रकार उघकडकीस आला आहे. त्यामुळे घरकुल योजनेतील घोळाचे मोठे बिंग फुटण्याची शक्यता आहे.
प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील डब्बेटोला येथील बेगनबाई सेवकराम रहांगडाले यांना पंचायत समिती अंतर्गत सन २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. त्याचा नोंदणी क्रमांक एमएच २२०१५९१ हा आहे. ज्यावर्षी त्यांना घरकुल मंजूर झाले त्यावेळेस फाईल तयार करायची आहे असे सांगून ग्रामपंचायतच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने त्यांच्याकडून आधारकार्ड, बँक पास बुक, घर टॅक्स पावती तसेच इतर कागदपत्रे घेवून गेला.त्यानंतर बेगनबाई आणि तिचा मुलगा लोकचंद रहांगडाले यांनी संबंधित पदाधिकाऱ्याला याबाबत वांरवार विचारणा केली असता त्यांनी टोलवाटोलवीचे उत्तर दिले.
त्यामुळे लोकचंदने तिरोडा येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयात चौकशी केली. तेव्हा त्यांना तुमच्या आईच्या नावाने घरकुल बांधकाम झाले असून त्यासाठी ५ ट्रॅक्टर रेतीच्या रॉयल्टीची नोंद असल्याचे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले. ही माहिती ऐकताच त्यांना धक्का बसला. त्यांनी याची अधिक खोलात जावून चौकशी केली असता त्यांच्या नावावर घरकुल बांधकामासाठी तीन वेळा एकूण ९० हजार रुपयांची उचल करण्यात आली असल्याचे आढळले.
सदर पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले नसून दुसºयाच व्यक्तीच्या नावावर जमा करुन उचल करण्यात आली. तसेच मस्टर क्रमांक ५८०७, ६४८२, ८४७३ व्दारे अकुशलची रक्कम १२ हजार ५८६ रुपये सही करुन काढण्यात आली.
अशा प्रकारे त्यांच्या नावावर एकूण १ लाख २ हजार ५८६ रुपयांची उचल करण्यात आली.विशेष म्हणजे बेगनबाई यांनी घरकुलाचे बांधकाम केले नसताना त्यांच्या नावावर बांधकाम केल्याचे दाखवून खोटी स्वाक्षरी करुन पैशाची उचल करण्यात आली आहे. त्यामुळे घरकुल बांधकाम प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास बराच घोळ पुढे येण्याची शक्यता आहे.
बांधकामाचे खोटे फोटो अपलोड
बेगनबाई रहांगडाले यांच्या नावावर घरकुल बांधकाम केल्याचे दाखवून पैशाची उचल करण्यात आली. तसेच बांधकाम झाल्याचे खोटे फोटो सुध्दा शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करुन शासनाची सुध्दा दिशाभूल संबंधित पदाधिकाऱ्यांने केली आहे. हा प्रकार बेगनबाई रहांगडाले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची जिल्हाधिकारी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करा
डब्बेटोला येथील बेगनबाई रहांगडाले या घरकुल लाभार्थ्याची दिशाभूल करुन त्यांच्या नावावर पैशाची उचल करणाऱ्या संबंधित पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्यांच्या नावावर उचल करण्यात आलेली रक्कम परत करण्यात यावी. अन्यथा याविरुध्द न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा बेगनबाई व तिचा मुलगा लोकचंद रहांगडाले यांनी दिला आहे.

मोठा घोळ पुढे येण्याची शक्यता
तिरोडा तालुक्यात घरकुल योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आहेत. तसेच बेगनबाई रहांगडाले सारख्या अनेक लाभार्थ्यांची फसवणूक झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठा घोळ समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Tackle money in the name of the beneficiary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.