टाकरीत माकडांचा हैदोस
By Admin | Updated: February 23, 2015 02:05 IST2015-02-23T02:05:34+5:302015-02-23T02:05:34+5:30
सतत चार-पाच महिन्यापासून टाकरी तसेच परिसरातील शेतात उभ्या कडधान्याच्या पिकांवर माकडाचा उपद्रव सुरू आहे.

टाकरीत माकडांचा हैदोस
आमगाव : सतत चार-पाच महिन्यापासून टाकरी तसेच परिसरातील शेतात उभ्या कडधान्याच्या पिकांवर माकडाचा उपद्रव सुरू आहे. या हैदोसामुळे गावकरी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करीत आहेत. वनविभागाने त्वरित या माकडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच तारेश्वरी गौतम व उपसरपंच श्यामसुंदर खोब्रागडे यांनी केली आहे.
गावातील नागरिकांचे कवेलूचे घर तयार केले आहेत. या कवेलूवरुन माकडाचा मोठा घोळका उड्या मारून इकडून तिकडे जात असतो. त्यामुळे कवेलूचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. यामुळे नवीन कवेलू घेतल्याशिवाय गरीब नागरिकांना पर्याय नाही.
पावसाळ्यापूर्वी नवीन कवेलू घरावर टाकण्यात आल्या नाही तर पावसाचे पाणी घरात घुसून घराची नासधुस झाल्याशिवाय राहणार नाही. गावाला लागून असलेल्या शेतात तूर, हरभरा व इतर कडधान्याचे पीक आहेत. त्या पिकावर माकडाचा समूह घोळक्याने जाऊन हातात आलेले पिक ते नष्ट करीत आहेत. एकटे शेतात कुणी शेतकरी जाऊ शकत नाही.
माकडाला हाकलण्याचा प्रयत्न केला तर माकड हाकलणाऱ्या व्यक्तीवर माकड हल्ला चढवितात. यामुळे गावात माकडाची भिती निर्माण झाली आहे. वनविभागाने या माकडाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)