यंत्रणांनी लोकांसाठी काम करावे

By Admin | Updated: April 19, 2017 00:15 IST2017-04-19T00:15:18+5:302017-04-19T00:15:18+5:30

केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन यंत्रणांनी लोकांसाठी काम करावे.

The system should work for the people | यंत्रणांनी लोकांसाठी काम करावे

यंत्रणांनी लोकांसाठी काम करावे

नाना पटोले : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा
गोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन यंत्रणांनी लोकांसाठी काम करावे. त्यामुळे एकमेकांच्या समन्वयातून विकासाला चालना मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात नुकतीच जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरु न ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार पटोले यांनी, योजनांची अंमलबजावणी करतांना यंत्रणांनी एक परिवार म्हणून काम करावे. शोषित, पिडीत व गरजू व्यक्तींना योजनांचा लाभ देणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून काम करावे. रोजगार हमी योजनेच्या ज्या मजुरांची मजूरी प्रलंबीत आहे त्यांना ती तातडीने देण्याची कार्यवाही करावी. जे लोक उघड्यावर शौचास जातील त्यांना शासकीय योजनांचा लाभ देवू नये. पाण्याचे महत्व लक्षात घेता भविष्यात कोणत्याही गावातून पावसाचे पाणी वाहून जाणार नाही याचे सुक्ष्म नियोजन करावे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची स्थिती निर्माण होणार नाही असे सांगितले.
गावपातळीवर काम करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षक, कृषी सहायक यांनी अत्यंत जबाबदारीने काम करावे असे सांगून खासदार पटोले यांनी, गावाच्या विकासासाठी येणाऱ्या निधीतून एक पैसाही परत जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. विकासाची कामे करतांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून कामे करावी. जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांना वीज वितरण कंपनीने तात्काळ वीज जोडणी करावी. प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेअंतर्गत गरजू व बेरोजगार तरु ण-तरु णींना कर्ज पुरवठा करावा. बँकांनी या योजनेअंतर्गत कर्ज मागणाऱ्या व्यक्तींची दिशाभूल करु नये. यापूढे जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून मुद्राची प्रकरणे मंजूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१ मे च्या ग्रामसभेतून गरजू व योग्य लाभार्थ्यांची घरकूलसाठी निवड करण्यात यावी असे सांगून खा.पटोले यांनी, माणूसकीच्या नात्यातून गरजू व गरीबांना राष्ट्रीय अर्थ सहाय्य कार्यक्र मांतर्गत विविध योजनांचा लाभ दयावा. जीवन प्राधिकरणने शहरवासीयांना शुध्द व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. दोन महिन्याच्या आत सर्व लाभार्थ्यांना उज्वला गॅस योजनेचा लाभ द्यावा. सेवाभावी संस्थेने यंत्रणांच्या समन्वयातून कौशल्य विकासाचे गरजू व बेरोजगारांना प्रशिक्षण दयावे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देवून नकली बियाणे, किटकनाशके व खतांची माहिती दयावी. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश कृषी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी काळे यांनी, जिल्ह्यात कौशल्य विकासाला गती देण्याची आवश्यकता आहे. कॅशलेस व्यवहारासाठी बँकांनी दुकाने, विविध आस्थापना आणि प्रतिष्ठानाला प्रोत्साहित करावे. जिल्ह्यातील दोन लाख ८० हजार कुटुंबांना कॅशलेस व्यवहार करता यावा यासाठी १०० कुटुंबांसाठी एक व्यक्ती याप्रमाणे २४०० व्यक्ती कुटुंबांना माहिती देत आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांना रुपी कार्डच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.पुलकुंडवार यांनी, ज्या गावच्या ग्रामरोजगार सेवकांच्या तक्र ारी असतील तर त्यावर संबंधित गावच्या ग्रामसभेने निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले. संचालन विस्तार अधिकारी राठोड यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक जवंजाळ यांनी मांडले.आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले. सभेला अर्जुनी-मोरगाव पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर, सालेकसा सभापती हिरालाल फाफनवाडे, आमगावच्या सभापती डोये, गोंदिया सभापती माधुरी हरिणखेडे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

Web Title: The system should work for the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.