Sylegaon school preserving cultural heritage | सांस्कृतिक वारसा जपणारी सिलेगाव शाळा
सांस्कृतिक वारसा जपणारी सिलेगाव शाळा

ठळक मुद्देसंडे अँकर। स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘मला बोलू द्या’ मंच

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा शैक्षणीक व भौतिक बाबतीतही पुढे येऊ लागल्या आहेत. त्यातील एक शाळा म्हणजे गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गणखैरा केंद्रातील ग्राम सिलेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे ही शाळा शैक्षणिक दर्जा उंचावणाऱ्या शाळांमधील एक शाळा म्हणून नावारूपास आली आहे.

मागील २-३ वर्षांपासून तालुका क्रीडा प्राविण्य प्राप्त शाळा म्हणून ही ओळखली जात आहे. जिल्हास्तरावर सांस्कृतीक कार्यक्रमात शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दरवर्षी इन्सपायर मध्ये विभागीयस्तरावर नाव नोंदविले आहे. मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत दोन विद्यार्थी प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. या शाळेत मूल्य शिक्षण संवर्धनाच्या माध्यामातून विद्यार्थ्यांचे नेतृत्व व वक्तृत्व कौशल्य जोपासण्यासाठी वैविध्यपूर्ण आदर्श परिपाठ शाळेत घेतला जातो. ‘जो दिनांक तो पाढा’ अंतर्गत आज जो दिनांक असेल त्या दिनाकांचा पाढा सर्व विद्यार्थ्यांना पाठांतर व्हावा यासाठी उपक्रम घेतला जातो. राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, देशप्रेम, सामाजिक बांधिलकी या मूल्यांची बालमनात रुजवन होण्यासाठी राष्ट्रीय नेते, समाजसुधारक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्राम, वीर क्रांतीकारक यांच्या जयंती व पुण्यतिथीचा कार्यक्रम, भाषण, प्रश्नमंजूषा व नाट्यरुपातून साजरा केला जातो.
वर्ग ५ व ८ मधील विद्यार्थ्यांचे नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अतिरिक्त वर्ग व प्रश्न पत्रिका सराव मुख्याध्यापक कमलेश मेश्राम घेतात. ‘मला बोलू दया’ मंच अंतर्गत परिपाठाच्यावेळी एका विद्यार्थ्याला समोर बोलावून त्याला त्याच्या आवडीच्या विषयावर इंग्रजीत बोलण्याच्या सरावाद्वारे विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची भीती दूर करण्याचे काम मुख्याध्यापक कमलेश मेश्राम करतात. एलआयपी अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी उंचाविण्यासाठी मुख्याध्यापक कमलेश मेश्राम, आर.वाय. डहाके, टी.वाय. भगत, एस.आर. साबळे, यु.डी. चकोले प्रयत्न करीत आहेत. शाळा सिद्धीमध्ये ही शाळा ‘अ’ स्तरावर आहे.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
विद्यार्थ्यांत प्रशासन व लोकसेवेची आवड निर्माण व्हावी, ग्रामीण भागातील विद्यार्थी कर्तृतत्वान अधिकारी बनावेत, स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी सुंदरसिंग साबळे यांच्या मार्गदर्शनात सदर उपक्रम घेतला जातो. विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मदतीने शाळेमध्ये परसबाग निर्माण केली आहे. यातून विद्यार्थ्यांना शेती करण्याचे प्रात्यक्षिक सहायक शिक्षक आर.वाय.डहाके देत आहेत.
नाट्यमय कलाविष्कार
आपल्या जिल्ह्यात झाडीबोली नाटकांची खूप आवड बघता शिक्षक टी.वाय. भगत आपल्या लेखनीतून लहान मुलांना नाट्य अभिनय कसे करावे याविषयी निर्देशनातून व प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करतात. यामुळे गावातील विद्यार्थी तिरोडा नाटकसंचात बालकलाकार म्हणून काम करतात. शाळेत चाललेल्या विविध उपक्रमात सिलेगावच्या ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. क्रीडा, पालकसभा, बालमेळाव्याला महिला मेळावा भरपूर संख्येत उपस्थित असतात.
नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्र
शाळेत नाविण्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळा शासनाकडून मिळाली आहे. त्याचा वापर शाळेतील विद्यार्थी करतात व तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थी विज्ञान केंद्राला भेट देतात. केंद्रातील साहित्य व प्रयोगांबद्दल भेट देणाऱ्या विद्यार्थी-शिक्षकांना शाळेतील इयत्ता ६, ७ व ८ वी मधील विद्यार्थी माहिती देतात. स्वयं अध्ययन, स्वजाणीव-विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी यु.डी. चाकोले आपल्या वर्गस्तरावर विविध उपक्रम राबवितात. इंग्रजी शब्द, स्पेलिंग, वाक्य तयार करणे याबद्दल मार्गदर्शन करतात.

शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता पातळी सतत वृद्धींगत करता येते. शाळेतील सर्व शिक्षक उपक्रमशील असल्याने नवनवीन प्रयोग व उपक्रम शाळेत राबविले जातात. शाळेची गुणवत्ता सतत वाढत आहे.
-कमलेश मेश्राम
मुख्याध्यापक

Web Title: Sylegaon school preserving cultural heritage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.