गोंदियातही स्वाईन फ्लूची दहशत

By Admin | Updated: February 19, 2015 01:02 IST2015-02-19T01:02:07+5:302015-02-19T01:02:07+5:30

महाराष्ट्रासह तेलंगाना, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण आढळत आहेत.

Swine Flu Panic in Gondiya | गोंदियातही स्वाईन फ्लूची दहशत

गोंदियातही स्वाईन फ्लूची दहशत

गोंदिया : महाराष्ट्रासह तेलंगाना, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात ३१ जानेवारीपर्यंत २२ स्वाईन फ्ल्यू रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातही स्वाईन फ्ल्यूची दहशत पसरली असून आरोग्य विभागाने दक्षता बाळगण्याच्या उपाययोजना सूचविल्या आहेत.
स्वाईन फ्ल्यू बाधित रूग्णांच्या उपचारासाठी गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात एका विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र अद्याप तिथे स्वाईन फ्ल्यू बाधित रुग्ण दाखल नसल्याचे सांगण्यात आले.
सन २००९ मध्ये साथ रूपाने आलेला इन्फ्ल्यूएंझा ए एच १ एन १ विषाणू आता आपल्या वातावरणाचा अविभाज्य अंग झाल्याने सिझनल फ्ल्यूप्रमाणे वर्तन करीत आहे. या विषाणूमधील जनुकीय लवचिकतेमुळे नवनवे विषाणू रूप विकसीत होत आहेत. इन्फ्ल्यूएंझाबाबत जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यरत आहेत. तर सक्षम सर्वेक्षणासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समन्वय असणे आवश्यक आहे.
त्यांच्यावर इन्फ्ल्यूएंझा (रूग्ण) सर्वेक्षण, सौम्यू फ्ल्यू रूग्णांवर लक्षणानुसार उपचार, अ व ब गटातील म्हणजे गंभीर स्वरूपातील रूग्णांना उपजिल्हा रूग्णालयात उपचार, निकट सहवासीतांचा शोध व उपचार ही जबाबदारी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व सर्व रूग्णालयांमध्ये फ्ल्यू सर्वेक्षणासाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना काही सूचना शासनाने दिल्या आहेत.
डासांनी डुकराला चावल्यापासून डुकराला फ्ल्यू होतो. अशा डासांनी मानसाला चावल्यास मानसाला फ्ल्यू होतो. अशी मान्यता असल्यामुळे त्याला स्वाईन फ्ल्यू हे नाव देण्यात आले. असा बाधित व्यक्ती खोकलल्यास किंवा शिंकल्यास त्याचे विषाणू जवळील व्यक्तींमध्ये प्रवेश करतात, अशा पद्धतीने स्वाईन फ्ल्यू पसरत असल्याचे मानले जाते. (प्रतिनिधी)
रूग्ण कसा ओळखावा (लक्षणे)
ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी व असा रूग्णांसाठी कोणतेही निदान न झाल्यास रूग्ण फ्ल्यू सदृश्य रूग्णाच्या व्याख्येत (इन्फ्ल्यूएंझा लाईक इलनेस) मोडतो. बालकांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचा ताप आढळतो. घसादुखी असलेल्या बालकांच्या तोंडातून अत्यधिक लाळ गळते, प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तीमध्ये अनेकदा ताप आढळत नाही.
तीव्र श्वसनदाह रूग्णाची लक्षणे
पाच वर्षावरील व्यक्तीमध्ये अचानक सुरू झालेला ३८ अंश सें. पेक्षा जास्त ताप, खोकला व घशात खवखव, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे व रूग्णालयात भरती करण्याची गरज भासते. पाच वर्षाखालील मुलांमध्ये न्यूमोनिया व भरती करण्याची गरज भासते.
निकट सहवासीतांचा शोध व उपचार
बाधित रूग्णांच्या संसर्गजन्य कालावधीत रूग्णाच्या सहा फुटापेक्षा जवळ सहवासात असलेल्या व्यक्तीस निकट सहवासीत म्हणतात. इन्फ्ल्यूएंझा ए एच१ एन१ चा अधिशयन कालावधी एक ते सात दिवसांचा आहे. रूग्णामध्ये लक्षणे आढळून येण्याच्या एक दिवस आधीपासून ते लक्षणे आढळल्याच्या पुढील सात दिवसांपर्यंत या विषाणूचा संसर्ग सहवासीतांमध्ये संक्रमित होवू शकतो. त्यामुळे रूग्णांच्या प्रत्यक्ष सहवासात असलेल्यांचा शोध घेवून उपचार करणे गरजेचे असते.

Web Title: Swine Flu Panic in Gondiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.