मिठाई व गुपचूपने ३४६ जणांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 02:03 IST2016-03-18T02:03:28+5:302016-03-18T02:03:28+5:30
येथील मंडई प्रसिद्ध असून त्यात विविध कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी परिसरातील जनसमुदाय एकत्रित येतो.

मिठाई व गुपचूपने ३४६ जणांना बाधा
ककोडीच्या मंडईतील प्रकार : वैद्यकीय चमूच्या सहकार्याने परिस्थिती नियंत्रणात
ककोडी : येथील मंडई प्रसिद्ध असून त्यात विविध कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी परिसरातील जनसमुदाय एकत्रित येतो. मंगळवारी १५ मार्च रोजी भरलेल्या मंडईत दुकानांमधील मिठाई व गुपचूपच्या सेवनाने तब्बल ३४६ नागरिकांची प्रकृती बिघडली. त्यांना ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार करण्यात आल्या. वेळीच उपचार मिळाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
ककोडी येथील मंडईत महाराष्ट्रासह छत्तीसगड येथील दुकाने लागले होते. यात २५ ते ३० मिठाईची दुकाने व तीन ते चार गुपचूपचे ठेले होते. रात्रभर विविध कार्यक्रम सुरू असल्याने नागरिक व पाहुणे मंडळींना रात्रभराचे जागरण झाले होते. शिवाय वातावरणातील बदल हासुद्धा नागरिकांची प्रकृती बिघडण्यास एक कारण ठरला. मंगळवारी मंडईनिमित्त आलेल्या पाहुणे मंडळी व गावकऱ्यांनी मिठाई व गुपचूप सेवन केल्यापासून त्यांना तीव्र ताप, शौच, उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. यात लहान मुले-मुली, तरूण-तरूणींचाही समावेश आहे.
सदर आजार आटोक्यात आला असून गुरूवारच्या सायंकाळपर्यंत ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ तीन ते चार रूग्ण शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)
खासगी डॉक्टर व पदाधिकाऱ्यांची मदत
बुधवारी रात्री तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हुमणे यांनी ग्रामीण रूग्णालय चिचगड येथील वैद्यकीय चमूसह ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. गुरूवारी सकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर यांनी भेट देवून प्रकरणाची शहानिशा केली. याप्रसंगी गावातील खासगी डॉक्टरांनीही मोलाची मदत करून सदर आजार आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले. सरपंच रियाज खान, पंचायत समिती सदस्य गणेश सोनबोईर, चैनसिंग मडावी, कोटवार यांनी रूग्णांना रूग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली.
दोन-तीन तासात सुटी
बुधवार व गुरूवारी या दोन्ही दिवशी तब्बल ३४६ रूग्णांवर ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. हे रूग्ण चिल्हाटी, ककोडी, धवलखेडी, गणूटोला, मूरमाडी, तुंबीकसा येथील रहिवासी आहेत. जागेअभावी प्रत्येक रूग्णास जवळपास दोन ते तीन तास उपचार करून नंतर सुटी देण्यात येत होती. वैद्यकीय अधिकारी जी.एस.काळे यांनी रूग्णांना ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून दिल्याने मोठे सहकार्य मिळाले. जनचर्चेनुसार मिठाई व गुपचूपच्या सेवनानेच मंडईतील लोकांना प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे.