पतीचा घातपात झाल्याची शंका
By Admin | Updated: March 28, 2017 00:54 IST2017-03-28T00:54:20+5:302017-03-28T00:54:20+5:30
तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा (काचेवानी) येथील एक युवक सात सहकाऱ्यांसोबत तिरुपती बालाजी (आंध्रप्रदेश) येथे कामाला गेला.

पतीचा घातपात झाल्याची शंका
पत्नीची तक्रार : सोबत्यांच्या हालचाली शंकास्पद, मोबाईल बंद, महिनाभरापासून बेपत्ता
काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा (काचेवानी) येथील एक युवक सात सहकाऱ्यांसोबत तिरुपती बालाजी (आंध्रप्रदेश) येथे कामाला गेला. तो एक महिन्यापासून बेपत्ता आहे. सोबत्यांचे शंकास्पद बयाण व हालचालीवरून माझ्या नवऱ्याचा घातपात तर केला नाही ना? अशी शंका घेत पत्नीने गंगाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रवी प्रभुदास चौधरी (३४) असे त्या बेपत्ता युवकाचे नाव आहे. बरबसपुरा येथील रहिवासी प्रदीप राजकुमार कोसरे, मुरलीधर रतिराम बागडे, देवेंद्र कोमल तुमसरे, राजू नवलू शेंदरे, आकाश श्रीकृष्ण उईके, योगेश राधेश्याम लाडे व पंकज मोहोपत टेकाम यांच्यासोबत तिरुपती बालाजी येथे प्रदीप कोसरे यांच्या बोलण्यावरून कामाला जाण्यासाठी १६ फेब्रुवारी २०१७ ला सकाळी घरुन निघाले.
रवी चौधरी यांची पत्नी नंदा यांनी पोलीस ठाणे आणि जिल्हा प्रशासनाला दिलेल्या तक्रारीत सांगितले की, प्रदीप राजकुमार कोसरे यांनी माझ्या नवऱ्याला १६ फेब्रुवारीला घरून नेले. १८ तारखेला महेंद्र कोमल तुमसरे यांच्या मोबाईल वरून माझ्या नवऱ्याची प्रकृती बिघडल्याचे दुसऱ्यांदा मोबाईलद्वारे प्रदीप कोसरे यांनी कळविले.
पत्नी नंदाला चार हजार रुपयांची मागणी करीत आणूण देण्याची बोलणी प्रदीपने केली. याला होकार दिला. दुसऱ्या दिवशी प्रदीप कोसरे यांनी फोनद्वारे कळवले की, रवी चौधरीला गावाला जाण्याकरिता रेल्वे गाडीत बसवून दिले आहे. दुसऱ्या दिवशी पत्नी नंदा आणि परिवाराने वाट पाहिली, परंतु तो घरी पोहोचला नाही. याची माहिती सोबतींचा म्होरक्या प्रदीप कोसरे व इतरांना देण्यात आली. तसेच का पोहोचला नाही, अशी विचारणा करण्यात आली.पत्नी नंदा आणि परिवाराच्या सदस्यांनी सांगितले की, प्रकृती बिघडल्यापासून रवी चौधरी याच्यासोबत कोणाचीही बोलणी करून देण्यात आली नाही. तसेच अन्य सोबत्यांना मोबाईलवर बोलणी करण्यास प्रदीप कोसरे टाळत असल्याचे लोकमत व पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
रेल्वेगाडीत बसवून दिल्याचे प्रदीप कोसरे यांनी सांगितले. पण कोणत्या ट्रेनने पाठवित आहोत, असे चौधरी परिवाराच्या कोणत्याही व्यक्तीला फोन करून सांगण्यात आले नाही. तसेच त्यावेळी रवी चौधरी यांची बोलणीसुद्धा करून देण्यात आली नाही. चौधरी परिवारासोबत झालेला वार्तालाप आणि सोबत गेलेल्या सोबत्यांनी पोलिसाला दिलेल्या बयाणावरून अशा अनेक शंकास्पद बाबी निर्माण होत आहेत. रवी चौधरी सोबत कसला तरी विश्वासघात किंवा घातपात करण्यात आला असावा किंवा एखादी दुर्घटना घडली असावी. म्होरक्या प्रदीपसह सातही सोबत्यांना वास्तव माहीत असून काही तरी बाब ते लपवित असल्याची शंकासुद्धा पत्नी नंदा यांच्यासह चौधरी परिवाराने व्यक्त केली आहे. पत्नी नंदा यांनी गंगाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून नवऱ्याचा घातपात किंवा हत्या करण्यात आली असावी, अशी शंका व्यक्त केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, गुन्हे अन्वेषण विभाग, गृह सचिव, मुख्यमंत्री, मानवाधिकार आयोग मुंबई, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे गंगाझरी यांना तक्रारी पाठविण्यात आल्या आहेत. गंगाझरी पोलीस कसून चौकशी करीत तपासा अंतीच वास्तव पुढे येईल. (वार्ताहर)
- तर ठाण्यातच
करणार आत्महत्या
पत्नी मंदा चौधरी यांनी गंगाझरी पोलिसांसमोर दिलेल्या बयाणात आणि प्रशासनाला दिलेल्या तक्रारीत स्पष्ट सांगितले की, माझा नवरा रवी चौधरी बेपत्ता झाला नसून सोबत नेलेल्या लोकांनी त्यांचा घातपात केला असावा. ज्या ठिकाणी काम होते तेथे दुर्घटना झाली असावी किंवा तेथील कंत्राटदार किंवा मालक मिळून हे प्रकरण लपविण्यासाठी नाटक करीत असावेत. माझ्या नवऱ्याचा शोध घेऊन आणूण द्यावे किंवा वास्तविकता येत्या ४ ते ५ दिवसात उलगडा करण्यात यावा, अन्यथा लहान मुलाला धरून पोलीस ठाण्यातच आत्महत्या करणार, असे लेखी तक्रारीत कळविले आहे.
गंगाझरी पोलिसांची कारवाई
पोलीस निरीक्षक सुनील उईके यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू करण्यात आला असून तपास कार्य योग्य बाजूने केला जात आहे. याचा उलगडा लवकरच करण्यात येईल. गरज पडल्यास उपविभागीय पोली अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचाही सल्ला घेण्यात येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
गंगाझरी पोलिसात १७ मार्च २०१७ ला विजय चौधरी आणि सुनील चौधरी यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, रवी प्रभुदास चौधरी हा घरी न परतल्याने पत्नीची मानसिकता बिघडत चालली आहे. दोन वर्षाच्या मुलाची जबाबदारी पाहता आपल्या दोन वर्षाच्या मुलासोबत जवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जवळच्या लोकांचे लक्ष गेल्याने तिला वाचविण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून सखोल चौकशी करुन कामाला नेणाऱ्या व्यक्तींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.