४ जुलैला शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण
By Admin | Updated: June 24, 2015 01:54 IST2015-06-24T01:54:48+5:302015-06-24T01:54:48+5:30
६ ते १४ वयोगटातील कोणताही बालक प्राथमिक शिक्षणाच्या मुलभूत अधिकारापासून वंचित राहू नये ...

४ जुलैला शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण
गोंदिया : ६ ते १४ वयोगटातील कोणताही बालक प्राथमिक शिक्षणाच्या मुलभूत अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी शाळेत न जाणारी व एक महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने शाळेत गैरहजर राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी शाळाबाह्य बालकांचे ४ जुलै रोजी एक दिवस सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणात दिनांक ४ जुलै रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शाळाबाह्य बालकांच्या नोंदी घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणी, बाजार, खेडे, गाव, वाडी, पाडे, तांडे, शेतमळ्यात, जंगलात वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून मदरसातील बालकांना शाळाबाह्य समजून त्या बालकांचे देखील सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
सर्वेक्षणाची कार्यपध्दती योग्यरितीने पार पाडावी याकरिता जिल्हा, तालुका व गावस्तरावर समित्या स्थापन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतच्या सूचना देण्यात आल्या.
हे सर्वेक्षण महसूल, ग्रामविास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महिला व बालविकास विभाग, कामगार, विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने व समन्वयातून पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) पाटील यांनी यावेळी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)