सावंगी परिसरात कृषी विभागाची पाहणी
By Admin | Updated: November 15, 2015 01:11 IST2015-11-15T01:11:57+5:302015-11-15T01:11:57+5:30
सावंगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावंगी, चिचटोला व ढिवरोला गावांतील धान पिकांची पाहणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.

सावंगी परिसरात कृषी विभागाची पाहणी
नुकसानीचा घेतला अंदाज : शेतकऱ्यांमध्ये मदतीची आशा पल्लवित
सोनपुरी : सावंगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावंगी, चिचटोला व ढिवरोला गावांतील धान पिकांची पाहणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.
या तिन्ही गावांत धानपिकावर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने पूर्ण पीक नष्ट झाले. विशेष म्हणजे जनावरांसाठी तनसही निघणार नाही एवढी स्थिती खराब आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या गावातील शेतकऱ्यांनी खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, तहसीलदारांपासून अन्य अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मदतीची मागणी केली. मात्र अधिकाऱ्यांकडून गावात जाऊन पिकांची पाहणी करण्यात आली नाही.
फक्त तालुका कृषी अधिकारी पी.एन.धरमशहारे, कृषीसहायक जी.एल.शेंडे यांनी गावात जाऊन मोकाचौकशी केली. मात्र शेतकऱ्यांना मदत वा मदतीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. नुकसान पाहता मदत मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
ही सर्व परिस्थिती बघता सावंगी व ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांना दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी सरपंच सुमेंद्र उपराडे, पोलीस पाटील महेंद्र दसरिया, ग्रामपंचायत सदस्य कुवरचंद रक्शे, ममता मच्छीरके, कृषीमित्र बिकेश लिल्हारे, शेतकरी रंजीतसिंह मच्छीरके, टेकसिंग मच्छीरके, तेजलाल लिल्हारे, कंकर दमाहे, हेमराज नवगोडे, राजकुमार भगत, मंगरू राणे, शिवचंद चौधरी, सुकलाल नवगोडे, जागेलाल दसरिया, सुंदरलाल लिल्हारे, तुफानसिंग मच्छीरके व शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)